भूम (प्रतिनिधी)- येथील शंकरराव पाटील कनिष्ठ महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने मौजे वालवड, ता. भूम, जि. धाराशिव येथे युवक जलसंधारण व्यवस्थापन व ओसाड भूमी विकास या विषयावर आयोजित युवा शिबिराचे उद्घाटन उत्साहात पार पडले. या शिबिराचा उद्देश युवकांच्या सहभागातून ग्रामीण विकास व समाजप्रबोधन साध्य करणे हा होता.
या कार्यक्रमाला प्रमुख म्हणून गावचे सरपंच पांडुरंग देवळकर, उपसरपंच कृष्णा मोहिते तसेच कृषी सहाय्यक आण्णासाहेब खटाळ हे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शंकरराव पाटील कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संतोष शिंदे हे होते.
उद्घाटन कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रा. धनश्री पिंपरे यांनी केले. कार्यक्रमाची भूमिका मांडणारे प्रास्ताविक प्रा. रामेश्वर सोळंके यांनी शिबिराचे सामाजिक व शैक्षणिक महत्त्व अधोरेखित केले. समारोपप्रसंगी कार्यक्रम अधिकारी प्रा. गंगाधर काळे यांनी आभार प्रदर्शन करत सर्व मान्यवर, ग्रामस्थ, स्वयंसेवक, विद्यार्थी व प्राध्यापकांचे सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. या युवा शिबिरामुळे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव वाढीस लागून जलसंधारण व ग्रामविकासाच्या कार्याला चालना मिळेल, असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला.
