कळंब (प्रतिनिधी)- कळंब शहरातील कचरा व्यवस्थापनाची समस्या गेल्या अनेक वर्षांपासून गंभीर स्वरूपाची बनली होती. शहरातील विविध भागांमध्ये नियमित स्वच्छतेअभावी कचऱ्याचे मोठमोठे ढीग साचले होते. यामुळे नागरिकांचे आरोग्य, पर्यावरण आणि शहराची एकूण प्रतिमा धोक्यात येत होती. या पार्श्वभूमीवर नगराध्यक्षा सौ. सुनंदा शिवाजी कापसे यांनी परिस्थितीची दखल घेत थेट कृतीचा मार्ग स्वीकारला आहे.
नगराध्यक्षा सौ. सुनंदा कापसे या केवळ कार्यालयात बसून आदेश देणाऱ्या नगराध्यक्षा न राहता, सोबत स्वतः रस्त्यावर उतरून अनेक वर्षांपासून दुर्लक्षित राहिलेल्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यांची साफसफाई सुरू केली. विशेषतः प्रभाग क्रमांक 07 मधील अनेक ठिकाणी साचलेला जुना कचरा हटवण्याचे काम प्रत्यक्ष पाहणी करून तातडीने सुरू करण्यात आले.
या स्वच्छता मोहिमेमुळे नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून, “अखेर आमच्या भागातही स्वच्छतेला सुरुवात झाली” अशा प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांकडून व्यक्त होत आहेत. अनेक वर्षे दुर्लक्षित राहिलेल्या भागांना नवसंजीवनी मिळत असल्याची भावना नागरिकांमध्ये दिसून येत आहे.
या स्वच्छता अभियानाच्या वेळी प्रभाग क्रमांक 07 चे नगरसेवक अमर चाऊस, नगरसेविका पूजा धोकटे तसेच मोठ्या संख्येने स्थानिक नागरिक उपस्थित होते. लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांच्यातील समन्वयातून कळंब शहर स्वच्छतेकडे एक ठोस पाऊल टाकत असल्याचे चित्र यावेळी पाहायला मिळाले.
नगराध्यक्षा सौ. सुनंदा कापसे यांच्या या कार्यतत्पर आणि ठाम भूमिकेमुळे कळंब शहरातील स्वच्छता व्यवस्थेला नवसंजीवनी मिळणार असून, “स्वच्छ शहर सुंदर शहर” ही संकल्पना केवळ घोषणे पुरती न राहता प्रत्यक्षात उतरत असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे.
