वाशी (प्रतिनिधी)- तालुक्यातील तांदुळवाडी शिवारातील भैरवनाथ शुगर वर्क्स येथे पत्रकार दिनानिमित्त वाशी शहर व तालुक्यातील पत्रकारांचा सन्मान समारंभ उत्साहात पार पडला. कारखान्याचे व्हाईस चेअरमन केशव सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित या कार्यक्रमात पत्रकारितेच्या माध्यमातून समाजासाठी कार्य करणाऱ्या पत्रकारांचा गौरव करण्यात आला.
या प्रसंगी पत्रकार गौतम चेडे, नवनाथ टकले, नेताजी नलवडे, दादासाहेब लगाडे, महंमद मुजावर, शिवाजी गवारे, शहाजी चेडे, सचिन कोरडे, शोएब काझी, नितीन सुकाळे आदी पत्रकारांचा सन्मान करण्यात आला. सत्कार स्वीकारताना पत्रकारांनीही समाजहितासाठी आपली लेखणी सदैव जागृत राहील, असा विश्वास व्यक्त केला. कार्यक्रमात मार्गदर्शन करताना केशव सावंत म्हणाले, “पत्रकार दिनानिमित्त पत्रकारांचा सत्कार करणे हे माझे कर्तव्य आहे. पत्रकार हा समाजाचा आरसा असून तो सातत्याने समाजसेवेचे काम करतो. पुढील वर्षी पत्रकारांच्या सहकार्याने पत्रकार दिनाचा भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात येईल.”
तसेच ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळा टिकवण्यासाठी पत्रकारांनी आवाज उठवावा, विद्यार्थ्यांची संख्या वाढवण्यासाठी प्रयत्न करावेत आणि या कार्यासाठी भैरवनाथ शुगर वर्क्सकडून सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, असे आश्वासनही त्यांनी दिले. या कार्यक्रमाला युवा सेना जिल्हा प्रमुख बाळासाहेब मांगले, तालुका प्रमुख सत्यवान गपाट, तालुका संघटक शिवहार स्वामी, तालुका उपप्रमुख विकास तळेकर, अतुल चौधरी प्रकाश शेटे, राहुल आडमुटे, दिनकर शिंदे, माऊली देशमुख, गायकवाड यांच्यासह तालुक्यातील शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. पत्रकार दिनानिमित्त आयोजित या सन्मान सोहळ्यामुळे पत्रकार व सामाजिक संस्थांमधील सकारात्मक संवाद अधिक दृढ होईल, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
