धाराशिव (प्रतिनिधी)-  महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) (3) अन्वये जिल्ह्यात जमावबंदी व शस्त्रबंदी आदेश लागू करण्यात आले आहेत.जिल्ह्यात विविध यात्रा, जत्रा, ऊर्स, महापुरुष व राष्ट्रीय पुरुष यांच्या जयंती, धार्मिक कार्यक्रम तसेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणावर गर्दी होण्याची शक्यता आहे. यामुळे कायदा व सुव्यवस्था बिघडण्याचा धोका निर्माण होऊ शकतो.

तसेच 26 जानेवारी 2026 रोजी प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर विविध संघटना,पक्ष व गटांकडून धरणे,मोर्चे, आंदोलने,उपोषणे,बंद, निदर्शने, रास्तारोको, तालाठोको यासारखे आंदोलनात्मक कार्यक्रम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात शांतता व कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी दिनांक 15 जानेवारी रोजी रात्री 1 वाजेपासून ते 28 जानेवारी रोजी रात्री 12 वाजेपर्यंत (दोन्ही दिवस धरून) संपूर्ण धाराशिव जिल्ह्यात महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) (3) अन्वये प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत.


याला आहे प्रतिबंध

अपर जिल्हादंडाधिकारी धाराशिव विद्याचरण कडवकर यांनी त्यांच्या अधिकारांचा वापर करून खालील बाबींवर मनाई केली आहे. शस्त्र, सोटे, काठ्या, तलवारी, बंदुका जवळ बाळगणे, लाठ्या, काठ्या किंवा शारीरिक इजा करू शकणाऱ्या वस्तू बाळगणे, दाहक पदार्थ किंवा स्फोटके जवळ बाळगणे,दगड,फेकण्यायोग्य साधने किंवा स्फोटक साहित्य साठवणे अथवा वापरणे, प्रक्षोभक भाषणे, असभ्य वर्तन, विडंबनात्मक नकला, सभ्यता व नीतीमत्तेला बाधा आणणारे प्रकार,संविधानविरोधी, देशाच्या सार्वभौमत्वाला धक्का देणाऱ्या घोषणा,गाणी,वाद्य वाजविणे किंवा कृती, व्यक्ती, मृतदेह, प्रेते किंवा त्यांच्या प्रतिमांचे प्रदर्शन, पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींचा जमाव किंवा मोर्चा / मिरवणूक काढण्यास मनाई (परवानगीशिवाय) करण्यात आली आहे.

मात्र हे आदेश अंत्ययात्रा,धार्मिक विधी, विवाह सोहळे, सामाजिक सण, शासकीय कार्यक्रम, शासकीय सेवेत तैनात कर्मचारी तसेच सार्वजनिक करमणुकीची ठिकाणे (सिनेमागृहे, रंगमंच इ.) यांना लागू राहणार नाहीत.

 
Top