वाशी (प्रतिनिधी)- लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील मौजे टाकळा येथील मातंग समाजातील अनुजा किरण पाटोळे (वय 12) ही विद्यार्थिनी जवाहर नवोदय विद्यालय, लातूर येथे सहावीमध्ये शिक्षण घेत होती. दिनांक 4 जानेवारी 2026 रोजी शाळेच्या परिसरातील शासकीय विश्रामगृहात तिचा मृतदेह आढळून आल्याने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

अनुजा ही अत्यंत हुशार, धाडसी व शाळेच्या प्रत्येक उपक्रमात सक्रिय सहभागी असल्याचे सांगितले जाते. तिच्या स्वभावावरून आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलण्याची शक्यता नसल्याचा दावा नातेवाईक व समाजबांधवांकडून करण्यात येत असून, ही आत्महत्या नसून घातपात असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. मृतदेह आढळल्यानंतर शाळेतील महिला शिक्षक व कर्मचाऱ्यांनी कुटुंबीयांना माहिती न देता अनुजाला लातूर येथील शासकीय रुग्णालयात हलविल्याचा आरोप आहे. तसेच प्राथमिक तपासणी न करता शवविच्छेदनासाठी मृतदेह पाठविण्यात आल्याने संपूर्ण प्रकरण संशयास्पद ठरत आहे. शवविच्छेदन अहवालात आत्महत्येचा उल्लेख करण्यात आला असला तरी घटनास्थळाची परिस्थिती पाहता ही आत्महत्या नसून जाणूनबुजून करण्यात आलेली हत्या असल्याचा गंभीर आरोप तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनद्वारे करण्यात आला आहे.

या घटनेच्या निषेधार्थ दिनांक 15 जानेवारी रोजी वाशी शहर कडकडीत बंद ठेवण्यात आला. बंद दरम्यान विविध सामाजिक संघटना, मातंग समाजबांधव व नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. यावेळी दोषींवर कठोर कारवाई, तसेच संपूर्ण प्रकरणाची एसआयटी व सीबीआयमार्फत चौकशी करून जलद गती न्यायालयात खटला चालवावा अशी मागणी करण्यात आली. यासंदर्भातील निवेदन वाशी तहसील कार्यालयात नायब तहसीलदार सांगळे यांनी स्वीकारले. आंदोलनावेळी अनेक मान्यवर, समाजबांधव व कार्यकर्त्यांनी आपले मनोगत व्यक्त करत अनुजा पाटोळे हिला न्याय मिळेपर्यंत लढा सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला. अनुजा पाटोळे यांच्या निर्घृण मृत्यूमुळे मातंग समाजासह संपूर्ण परिसरात तीव्र संताप व दुःखाची भावना पसरली असून दोषींना शिक्षा व पीडित कुटुंबाला न्याय मिळेपर्यंत शांत न बसण्याचा इशारा समाजबांधवांनी दिला आहे.

 
Top