धाराशिव (प्रतिनिधी)- प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत खरीप हंगामात एकूण 12 हजार 575 पीक विमा अर्ज विमा कंपनीमार्फत विविध कारणांमुळे रद्द करण्यात आले होते, तर 13 हजार 539 विमा अर्ज त्रुटी पूर्ततेसाठी ऑनलाईन सेवा केंद्रांकडे परत करण्यात आले होते.
या प्रकरणी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय तक्रार निवारण समितीची बैठक 22 डिसेंबर 2025 रोजी पार पडली.या बैठकीत जिल्हाधिकारी यांनी रद्द झालेल्या 12 हजार 575 विमा अर्जदारांना योजनेत सहभाग नोंदविण्यासाठी एक संधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने विमा कंपनीने अर्ज त्रुटी पूर्ततेसाठी ऑनलाईन सेवा केंद्रांकडे परत करण्याचे निर्देश दिले.यामुळे शेतकऱ्यांना ऑनलाईन सेवा केंद्रामार्फत आवश्यक त्रुटी दुरुस्त करून योजनेतील सहभाग कायम ठेवता येणार आहे. त्याअनुषंगाने विमा कंपनीने खरीप हंगामात रद्द करण्यात आलेले 12 हजार 575 विमा अर्ज 16 जानेवारी 2026 रोजी ऑनलाईन सेवा केंद्रांकडे परत केले असून, त्या विमा अर्जांच्या तालुकानिहाय याद्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयांना उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत.
विमा अर्जांच्या त्रुटी पूर्ततेसाठी केवळ सात दिवसांची मुदत देण्यात आली आहे.त्यामुळे ज्या शेतकऱ्यांचे पीक विमा अर्ज रद्द झालेले आहेत, त्यांनी ज्या ऑनलाईन सेवा केंद्रामार्फत पीक विमा अर्ज भरलेला आहे,त्या ऑनलाईन सेवा केंद्राशी तातडीने संपर्क साधून आवश्यक कागदपत्रांसह 23 जानेवारी 2026 पूर्वी आपल्या विमा अर्जाची त्रुटी पूर्तता करून घ्यावी,अन्यथा संबंधित विमा अर्ज रद्द होण्याची शक्यता आहे. तरी शेतकऱ्यांनी अंतिम मुदतीची वाट न पाहता त्वरित संबंधित ऑनलाईन सेवा केंद्राशी संपर्क साधून आपल्या पीक विमा अर्जातील त्रुटी आवश्यक कागदपत्रांसह दुरुस्त करून घ्याव्यात,असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी केले आहे.