धाराशिव (प्रतिनिधी)-महाराष्ट्रामध्ये 15 जानेवारी रोजी 29 महानगरपालिकांसाठी मतदान पार पडले. मतदान केल्यानंतर मतदारांच्या बोटावर मार्कर पेनने लावली जाणारी शाई निघून जात असल्याचे अनेक ठिकाणी आढळून आले. परिणामी मतदानामध्ये होणारे गैरप्रकार आणि फसवणूक मोठ्या प्रमाणात झाली. त्यामुळे देशभरात पुढील होणाऱ्या लोकसभा ते ग्रामपंचायतच्या सर्व निवडणुकांमध्ये मार्कर पेन ऐवजी पर्मनंट शाईचा वापर करावा, अशी मागणी भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सचिव डॉ. स्मिता शहापूरकर यांनी केली आहे.
भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना 16 जानेवारी रोजी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत देण्यात आलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, महाराष्ट्र राज्यात 29 महापालिकांसाठी 15 जानेवारी रोजी झालेल्या मतदान प्रक्रिया पार पडली. या मतदान प्रक्रियेत मतदार यादी मध्ये नावाचा घोळ तसेच मतदान झाल्यानंतर मतदारांच्या बोटाला मार्कर पेनने लावली जाणारी शाई पुसली जात असल्याचा प्रकार सर्वत्र घडला आहे. या प्रकारामुळे एकाच मतदाराने अनेक ठिकाणी मतदान केल्याची शक्यता नाकारता येत नाही. मार्कर पेनने बोटावर लावलेली शाही लवकर पुसल्याने याचा फायदा सत्ताधाऱ्यांनाही झाला आहे. झालेल्या या प्रकारामुळे मतदारांमध्ये लोकशाही प्रक्रियेवरील अविश्वासाची भावना तयार झाली आहे.
भारतातील निवडणुकांमध्ये मागील अनेक वर्षांपासून लोकसभा ते ग्रामपंच्यातच्या निवडणुकीमध्ये शाईचा वापर केला जातो. निवडणुकीमध्ये होणारी फसवणूक, गैरप्रकार टाळण्यासाठी ही शाई प्रभावी ठरली आहे. मागील निवडणुकांमध्ये वापरल्या गेलेल्या या शाईमध्ये सिल्व्हर नायट्रेट हा मुख्य घटक असतो. तो त्वचेतील प्रथिनांशी प्रतिक्रिया देतो आणि त्यामुळे शाई सहज पुसली जात नाही.साधारणतः ही शाई 7 ते 14 दिवसांपर्यंत बोटावर स्पष्टपणे दिसते. शाई ही स्वस्त, सोपी व प्रभावी पद्धत आहे. कोणत्याही इलेक्ट्रॉनिक साधनांशिवाय काम करणारी प्रणाली आहे.
एकदा मतदान केलेला मतदार पुन्हा मतदान करू शकत नाही. निवडणूक प्रक्रियेची पारदर्शकता वाढवण्यास मदत झाली आहे. यामुळे लोकशाही प्रक्रियेवरील जनतेची विश्वासाहर्ता वाढीस मदत होणार आहे. त्यामुळे देशभरात पुढील होणाऱ्या लोकसभा ते ग्रामपंचायतच्या सर्व निवडणुकांमध्ये मार्कर पेन ऐवजी पर्मनंट शाईचा वापर करावा, अशी मागणी डॉ. स्मिता शहापूरकर यांनी राष्ट्रपती यांच्याकडे केली आहे.
