परंडा (प्रतिनिधी)- शिक्षणमहर्षी गुरुवर्य रा.गे.शिंदे महाविद्यालय, परंडा येथे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक, सामाजिक व आर्थिक उन्नतीच्या दृष्टीने “शिष्यवृत्ती अर्ज भरणे मोहिम” मोठ्या उत्साहात व प्रभावीपणे राबविण्यात आली. ही विशेष मोहिम दिनांक 01 जानेवारी 2026 ते 10 जानेवारी 2026 या कालावधीत यशस्वीपणे पार पडली.
सदर मोहिमेचा प्रमुख उद्देश म्हणजे महाविद्यालयातील सर्व पात्र विद्यार्थ्यांना राज्य शासन पुरस्कृत शिष्यवृत्ती योजनांची सखोल माहिती देणे, तसेच शिष्यवृत्ती अर्ज भरताना विद्यार्थ्यांना येणाऱ्या विविध अडचणी, शंका व तांत्रिक समस्यांचे त्वरित निरसन करणे हा होता. अनेक वेळा माहितीअभावी किंवा तांत्रिक अडचणींमुळे विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहतात, ही बाब लक्षात घेऊन महाविद्यालयाच्या वतीने ही मोहिम आयोजित करण्यात आली.
या मोहिमेमध्ये महाविद्यालयाचे शिष्यवृत्ती नोडल अधिकारी डॉ.प्रकाश सरवदे यांनी प्रमुख मार्गदर्शक म्हणून महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांनी विद्यार्थ्यांना महाडीबीटी () पोर्टलवर शिष्यवृत्ती अर्ज कसा भरावा,अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती, पात्रता अटी काय आहेत. अर्जातील माहिती कशी तपासावी, तसेच अर्ज नाकारले जाण्याची कारणे व ती कशी टाळावीत याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.
या कालावधीत विद्यार्थ्यांना राज्य शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या एकूण 14 शिष्यवृत्ती योजनांची सविस्तर माहिती देण्यात आली. त्यामध्ये शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती, निर्वाह भत्ता योजना, गुणवंत विद्यार्थ्यांसाठी सहाय्य योजना, सामाजिक व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी असलेल्या विविध शिष्यवृत्ती योजनांचा समावेश होता. प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या पात्रतेनुसार शिष्यवृत्ती अर्ज भरावा, तसेच कोणताही पात्र विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहू नये, असे आवाहन डॉ. प्रकाश सरवदे यांनी विद्यार्थ्यांना केले. यावेळी त्यांनी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती अर्ज भरावेत, असे प्रेरणादायी आव्हानही उपस्थित विद्यार्थ्यांना दिले.
या विशेष मोहिमेदरम्यान विद्यार्थ्यांना येणाऱ्या वैयक्तिक अडचणी, कागदपत्रांबाबतच्या समस्या, उत्पन्न दाखला, जात प्रमाणपत्र, बँक खाते व आधार लिंकिंग, तसेच ऑनलाईन अर्जातील तांत्रिक अडचणी यांचे तत्काळ व प्रभावी निरसन करण्यात आले. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये शिष्यवृत्ती अर्ज भरण्याबाबत आत्मविश्वास निर्माण झाला असून, अर्ज प्रक्रियेस सकारात्मक प्रतिसाद मिळाला. या मोहिमेस महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ माहेशकुमार माने डॉ रंदील जी एस.डॉ.खर्डे अरुण , डॉ .शहाजी चंदनशिवे,डॉ .बाळासाहेब राऊत डॉ.
निलोफर चौधरी , प्रा.हुके हे विचार मंचावर उपस्थित होते त्याचबरोबर विविध विभागांचे प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, तसेच विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. एकूणच, शिक्षणमहर्षी गुरुवर्य रा.गे.शिंदे महाविद्यालय, परंडा येथे राबविण्यात आलेली “शिष्यवृत्ती अर्ज भरणे मोहिम” ही विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त, मार्गदर्शक व प्रेरणादायी ठरली असून, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीस आणि आर्थिक स्थैर्यास निश्चितच हातभार लावणारी ठरली आहे.
