धाराशिव (प्रतिनिधी)- महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 हा कायदा नागरिकांना शासनाकडून मिळणाऱ्या विविध सेवा ठराविक कालमर्यादेत मिळाव्यात यासाठी करण्यात आला आहे.या सेवा वेळेत,पारदर्शक व उत्तरदायी पद्धतीने मिळाव्यात तसेच विलंब व दिरंगाईला आळा घालणे,हा या कायद्याचा उद्देश आहे.या अधिनियमाची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करण्याचे अनुषंगाने आपले सरकार पोर्टलवर प्राप्त तक्रारी विभागांनी तात्काळ निकाली काढून नागरिकांना वेळेत सेवा द्याव्यात.असे निर्देश निवासी उपजिल्हाधिकारी विद्याचरण कडवकर यांनी दिले.
आज जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम2015 ची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या अनुषंगाने आपले सरकार पोर्टलअंतर्गत अपील मोड्यूलच्या प्रशिक्षण कार्यक्रमात कडवकर बोलत होते. यावेळी तहसीलदार (महसूल) प्रकाश व्हटकर यांच्यासह विविध विभागाचे प्रमुख अधिकारी तसेच जिल्ह्यातील विविध विभागांचे प्रथम/द्वितीय अपील प्राधिकारी उपस्थित होते.
कडवकर म्हणाले की,नागरिकांना सेवा देताना प्रत्येक विभागाच्या सेवांची प्रभावी अंमलबजावणी झाली पाहिजे.विविध विभागाच्या अधिकारी कर्मचारी यांना या कायद्याबाबत सखोल माहिती असली पाहिजे.नागरिकांना सेवा विहित मुदतीत मिळाल्या पाहिजे.अपील झाले तर प्रत्यक्ष किंवा ऑनलाईन सुनावणी ताबडतोब केली पाहिजे.त्यामुळे प्रश्न निकाली काढता येतील.घरबसल्या नागरिकांना ऑनलाइन सेवा मिळाल्या पाहिजे.विभागांनी विहित वेळेत सेवा देण्याची जबाबदारी या कायद्याअंतर्गत पार पाडली पाहिजे,असे ते म्हणाले. यावेळी महाआयटीचे जिल्हा समन्वयक पृथ्वीराज बिराजदार व जिल्हा प्रकल्प व्यवस्थापक तानाजी हंगरेकर यांनी महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 च्या अनुषंगाने आपले सरकार पोर्टलबाबत विस्तृत माहिती ऑनलाईन प्रात्यक्षिकाद्वारे उपस्थित प्रथम/द्वितीय अपील प्राधिकाऱ्यांना दिली व त्यांच्या शंकांचे समाधान केले.