मुरूम( प्रतिनिधी) - क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले, पहिल्या मुस्लिम महिला शिक्षिका फातिमा बी शेख आणि राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त मराठा सेवा संघाच्या वतीने मंगळवारी (ता. १३) महानायिका जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त शहरातील महिला नगरसेविकांचा सन्मान नगरपरिषदेच्या सभागृहात मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार प्रा. डॉ. महेश मोटे होते. यावेळी ईश्वरी क्लिनिकच्या डॉ. प्रीती चिलोबा, जिजाऊ ब्रिगेडच्या दैवशाला सावंत, सुप्रिया इंगळे आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी मान्यवरांच्या हस्ते महिला नगरसेविकांचा फेटा बांधून शाल, पुष्पगुच्छ व ग्रंथ देऊन सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी डॉ. प्रीती चिलोबा मनोगत व्यक्त करताना म्हणाल्या, महिलांनी शिक्षण, आरोग्य व सामाजिक न्याय या क्षेत्रात पुढाकार घेतल्यास खऱ्या अर्थाने सक्षम समाज उभा राहील. महिलांचे आरोग्य, सन्मान आणि स्वावलंबन हे विकासाचे खरे मोजमाप आहे. अशा सन्मान सोहळ्यामुळे महिलांचा आत्मविश्वास अधिक बळकट होतो. अध्यक्षीय समारोपप्रसंगी प्रा. डॉ. महेश मोटे म्हणाले, सावित्रीमाई फुले यांनी शिक्षणाचा वसा दिला, फातिमा बी शेख यांनी सामाजिक सलोखा शिकवला तर जिजाऊंनी नेतृत्व, धैर्य व राष्ट्रनिर्मितीचे संस्कार दिले. या महानायिकांचा वारसा आजच्या महिला लोकप्रतिनिधींनी पुढे नेणे ही काळाची गरज आहे. महिला नगरसेविका या केवळ प्रतिनिधी नसून समाजपरिवर्तनाच्या शिल्पकार आहेत. मराठा सेवा संघाच्या माध्यमातून महिला नगरसेविकांचा गौरव करत त्यांचे योगदान शहराच्या सर्वांगीण विकासासाठी मोलाचे ठरेल. नवनिर्वाचित नगरसेविका ज्योती शेळके व अंकिता अंबुसे यांनी सत्काराला उत्तर देताना मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमासाठी मराठा सेवा संघाचे अध्यक्ष श्रीधर इंगळे, तालुका उपाध्यक्ष संजय सावंत, किशोर आळंगे, मारुती बन्ने, प्रकाश कंटेकुरे, सूर्यकांत तडकले, विनोद सुरवसे, श्रावणी इंगळे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक पत्रकार मोहन जाधव यांनी समाजात परिवर्तन घडवणाऱ्या महानायिकांच्या स्मृती जपत महिलांच्या नेतृत्वाचा गौरव करणे हा या सोहळ्याचा मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले. सूत्रसंचालन पत्रकार अजिंक्य मुरुमकर तर आभार बाबा कुरेशी यांनी मानले. महानायिकांच्या विचारांचा जागर करत महिलांच्या नेतृत्वाचा सन्मान करणारा हा उपक्रम उपस्थितांसाठी प्रेरणादायी ठरला.
सत्कारमूर्ती महिला नगरसेविका महादेवी बनसोडे, अंकिता अंबुसे, निर्मला कंटेकुरे, मुमताजबी ढोबळे, ज्योती शेळके, सुनिता बन्ने, समीना मुल्ला, रागिनी गायकवाड यांचा सत्कार करण्यात आला.
