मुरूम( प्रतिनिधी) - डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर मार्च/एप्रिल-२०२५ मध्ये घेण्यात आलेल्या एम. ए. राज्यशास्त्र परीक्षेत मुरूमच्या श्री माधवराव पाटील महाविद्यालयातील राज्यशास्त्र पदव्युत्तर विभागातील कुमारी प्रियंका विजयकुमार मुंडासे यांनी विद्यापीठातून गुणवत्ता यादीमध्ये प्रथम क्रमांक पटकाविला. त्यांना डॉ. रमेश अनंत ढोबळे (संभाजीनगर) यांच्यामार्फत सुवर्णपदक व कै. प्रा. उत्तमराव दिपाजी सूर्यवंशी (नांदेड) यांच्या स्मरणार्थ दोन सुवर्णपदक (मेडल ऑफ मेरिट), प्रशस्तीपत्र ८७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष सुप्रसिद्ध साहित्यिक प्रा. फ. मु. शिंदे व विद्यापीठाचे कुलगुरू प्रोफेसर डॉ. विजय फुलारी यांच्या हस्ते प्रियंका मुंडासे यांचा विद्यापीठाच्या नाट्यगृहात बुधवारी (ता. १४) रोजी ३२ व्या विद्यापीठ नामविस्तार दिनाचे औचित्य साधून त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी प्र-कुलगुरू प्रो. डॉ. वाल्मीक सरवदे, परीक्षा नियंत्रक प्रो. डॉ. बाबासाहेब डोळे, विद्यापीठ व्यवस्थापन सदस्य डॉ. अपर्णा पाटील, डॉ. भारत खंदारे, कुलसचिव प्रो. डॉ. प्रशांत अमृतकर, विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक डॉ. कैलास अंभुरे आदींची प्रमुख उपस्थिती होती. तसेच एम. ए. राज्यशास्त्र पदव्युत्तर विषयात विद्यापीठातून कुमारी प्रीती विजयकुमार मुंडासे यांनी गुणवत्ता यादीत द्वितीय क्रमांक पटकाविला. एकाच कुटुंबात जन्मलेल्या, एकाच स्वप्नासाठी झटणाऱ्या जुळ्या बहिणींनी शैक्षणिक भरारी घेत आपल्या कर्तुत्वाने विद्यापीठातून राज्यशास्त्र विषयात उल्लेखनीय यश संपादन केल्याबद्दल माजी मंत्री बसवराज पाटील, नगर शिक्षण विकास मंडळाचे अध्यक्ष बापूराव पाटील, उमरगा जनता सहकारी बँकेचे चेअरमन शरण पाटील, संस्थेचे सचिव व्यंकटराव जाधव गुरुजी, उपप्राचार्य डॉ. चंद्रकांत बिराजदार, राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ. सायबण्णा घोडके, राज्यशास्त्र संशोधन केंद्राचे समन्वयक प्रा. डॉ. महेश मोटे आदींनी त्यांचे विशेष अभिनंदन केले. या दोघींनी राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण घेत असताना नियमित अभ्यास, वेळेचे नियोजन, सातत्यपूर्ण मेहनत ही त्यांच्या यशाची गुरुकिल्ली ठरली. स्पर्धा एकमेकींशी नसून स्वतःशी असते. या यशामागे आई-वडिलांचे संस्कार, राज्यशास्त्र विषयाच्या प्राध्यापकांचे मार्गदर्शन आणि कुटुंबातील शैक्षणिक वातावरण महत्त्वाचे ठरले. भविष्यात उच्च शिक्षण घेऊन प्रशासकीय सेवा करण्याचा मानस दोघींनी यावेळी व्यक्त केला. त्यांचे वडील विजयकुमार धानप्पा मुंडासे हे सैन्य दलातून सेवानिवृत्त माजी सैनिक तर आई जयश्री मुंडासे असून हे दोघेही उद्योजक आहेत. त्यांच्या या यशाबद्दल महाविद्यालय, नातेवाईक व परिसरातील नागरिकांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
फोटो ओळ : मुरूम, ता. उमरगा येथील श्री माधवराव पाटील महाविद्यालयातील एम. ए. राज्यशास्त्र विषयात विद्यापीठातून गुणवत्ता यादीत प्रियंका मुंडासे प्रथम क्रमांक पटकाविल्याबद्दल विद्यापीठाच्या नाट्यगृहात त्यांचा सत्कार फ. मु. शिंदे, विजय फुलारी, वाल्मीक सरवदे यांच्या हस्ते करताना.
