धाराशिव (प्रतिनिधी)- डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ 32 वा नामविस्तार दिन विद्यापीठ उपपरिसरात उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. प्रा. डॉ. प्रभाकर कोळेकर यांनी प्रमुख अतिथी म्हणुन विशेष व्याख्यान दिले. विद्यापीठ उपपरिसराचे संचालक प्रा. डॉ. रमेश चौगुले यांनी अध्यक्षस्थान भूषविले. 

प्रमुख पाहुण्यांचा परिचय प्रा. परिवर्तन जगझाप यांनी करुन दिला.  प्रा. डॉ. प्रभाकर कोळेकर, इतिहास विभाग, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर यांनी “ नामविस्तार आणि मानवी हक्क चळवळ“ या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले. आपल्या व्याख्यानात त्यांनी सर्व इतिहास हा मानवी हक्काचा आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची चळवळ मानवी हक्कांबाबत आहे. भारताला उज्ज्वल शिक्षण परंपरा लाभलेली आहे. मानवी हक्काची तत्वे मुळात भारतीय ग्रंथात वर्णन केलेली आहेत. 

समानता, मानवी हक्क शिक्षणातून जपले पाहिजेत. चवदार तळ्याचा सत्याग्रह, मंदिर प्रवेशाची चळवळ या मानवी हक्क विषयक चळवळी आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अहिंसक क्रांतीवर विश्वास होता. साउथबरो कमिशनसमोर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वांना मतदानाचा अधिकार देण्याची मागणी केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी हैदराबाद मुक्तिसंग्रामात महत्वपूर्ण योगदान दिले. आर्थिक लोकशाही व सामाजिक लोकशाही भारतात प्रस्थापित झाल्यावर राजकीय लोकशाही योग्य प्रकारे रुजेल. शिक्षणाची दारे खुली करून देण्यात आली. लोकगीते,पोवाडे, साहित्य निर्माण झाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव विद्यापीठास देऊन नामविस्तार करण्यात आला. सामाजिक परिवर्तन हि हळुहळु होणारी व चिरकाल टिकणारी गोष्ट आहे, असे प्रतिपादन केले. 

 विद्यापीठ उपपरिसराचे  संचालक प्रा. डॉ. रमेश चौगुले यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. सामाजिक न्याय, समतेचा हा लढा महत्वपूर्ण आहे. सामाजिक न्यायाची चळवळ हि लोकशाही मजबूत करणारी आहे, असे त्यांनी म्हटले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाचा समारंभ झाला.  डॉ. गणेश शिंदे, समन्वयक, विद्यार्थी विकास विभाग यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.  नाट्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ. महेश्वर कळलावे यांनी आभार व्यक्त केले. विद्यापीठ उपपरिसरातील विभागप्रमुख, प्राध्यापक, कर्मचारी बहुसंख्येने कार्यक्रमास उपस्थित होते.


 
Top