धाराशिव (प्रतिनिधी)- ग्रामसेवक हा ग्रामविकासाचा महत्त्वाचा कणा असल्याचे प्रतिपादन आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी केले. जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये सन 2022- 23 व 23 -24 या वर्षासाठीचे आदर्श ग्रामसेवक पुरस्कार वितरण करण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते.
समारंभाचे अध्यक्ष म्हणून जिल्हाधिकारी कीर्तीकरण पूजार, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मैनाक घोष हे उपस्थित होते.
याप्रसंगी समारंभाचे अध्यक्ष म्हणून बोलताना जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी गाव विकासात ग्रामसेवक महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. तसेच बेघरासाठी शासन योजनेतून घरांची उपलब्धता, पिण्यासाठी स्वच्छ पाणी, उपजीविकेसाठी साधन निर्मिती आणि गावातील ग्रामस्थांना मूलभूत पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यास महत्वाची भूमिका बजावत आहेत, असे सांगितले. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ मैनाक घोष यांनी याप्रसंगी सर्व ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी आपल्या गावातील शंभर टक्के योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी. असे सांगितले. यावेळी ग्रामसेवक, त्यांच्या सुविद्या पत्नी, माता व पालकांचे अभिनंदन करून चांगल्या कामासाठी प्रोत्साहित केले.
सदर कार्यक्रमास मुख्य लेखा व वित्त अधिकारी सचिन इगे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सामान्य तुकाराम भालके, उपमुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत अनंत कुंभार, शिक्षण अधिकारी प्राथमिक मापारी, शिक्षण अधिकारी माध्यमिक साळुंखे, कार्यकारी अभियंता बांधकाम संजय वागजे, कार्यकारी अभियंता पाणी पुरवठा विभाग सुनील कटकदौंड, सन्मानित ग्रामपंचायतीचे सरपंच, ग्रामपंचायत अधिकारी संघटनाचे अध्यक्ष जगताप, सचिव घोगरे, उपाध्यक्ष नलावडे व सदस्य, विस्ताराधिकारी संघटनेचे अध्यक्ष साळुंखे, सचिव भांगे, सदस्य, ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष शिंदे व सर्व सदस्य, ग्रामपंचायत अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनंत कुंभार यांनी केले. तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन विजयसिंह नलावडे यांनी केले.

