मुरूम (प्रतिनिधी)- श्री लाल बहादुर मागास समाजसेवा मंडळ, उमरगा संचलित विठ्ठल साई कनिष्ठ महाविद्यालय, नाईक नगर, सुंदर वाडी, ता. उमरगा, जि. धाराशिव येथे दिनांक 3 जानेवारी रोजी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त बालिका दिन, पालक मेळावा व विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. बालिका दिनानिमित्त विद्यार्थिनींनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनकार्यावर आधारित भाषणे व विचार मांडले. यावेळी स्त्री शिक्षणाचे महत्त्व व महिलांच्या सक्षमीकरणावर भर देण्यात आला. पालक मेळाव्यात पालक व शिक्षक यांच्यात विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीबाबत सुसंवाद साधण्यात आला. पालकांनी आपल्या सूचना मांडल्या तर शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाबाबत मार्गदर्शन केले. विज्ञान प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी विविध वैज्ञानिक प्रयोग व प्रकल्प सादर केले. या प्रदर्शनाला पालक व नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक दृष्टिकोनाचे उपस्थित मान्यवरांनी कौतुक केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य, शिक्षकवृंद व विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
