वाशी(प्रतिनिधी)- हिंदू-मुस्लीम ऐक्याचे जिवंत प्रतिक म्हणून ओळख असलेल्या थोर संत सय्यद शहाअब्दाल रहे. यांचा 832 वा उरूस वाशी शहरात अत्यंत भक्तिमय, शिस्तबद्ध व शांततेच्या वातावरणात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. धार्मिक सलोखा, सामाजिक एकोपा आणि परंपरेचा वारसा जपत दरवर्षीप्रमाणे यंदाही उरूस मोठ्या श्रद्धेने पार पडला.

उरूसानिमित्त सोमवार दि. 05 जानेवरा रोजी सायंकाळी ठीक 6 वाजता मुख्य दर्ग्यामध्ये पारंपरिक पद्धतीने काझी बिरादरीतील सदस्यांच्या डोक्यावर संदल ठेवून संदल मिरवणुकीस सुरुवात झाली. “या रहे”च्या गजरात आणि भक्तिमय वातावरणात निघालेल्या या मिरवणुकीत भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. रात्री उशिरापर्यंत ही मिरवणूक अखंड सुरू होती.

वर्तक चौक येथील मुख्य दर्ग्यापासून वाणी गल्ली, जुने बसस्थानक, नाईकवाडी गल्ली मार्गे पुन्हा मुख्य दर्ग्यात संदल मिरवणूक दाखल झाली. दर्ग्यामध्ये उरूस कमेटीच्या वतीने उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. तसेच दर्ग्याचा गिलाफ वंशपरंपरेने स्वच्छ ठेवण्याची पवित्र सेवा बजावणारे सोमनाथ परीट यांचा विशेष सन्मान करण्यात आला. यानंतर फातेहा खाणी होऊन सर्व भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. संपूर्ण उरूस काळात सर्व धार्मिक विधी पारंपरिक पद्धतीने, सलोख्याने व शांततेत पार पडले. या उरूसाच्या माध्यमातून वाशी शहरात सामाजिक सौहार्द, बंधुभाव आणि धार्मिक एकतेचे दर्शन घडले. या पवित्र उरूस सोहळ्यास बंडू कवडे, नागनाथ बापू नाईकवाडी, बळवंत कवडे, विशाल महामुनी, डॉ. कुलकर्णी यांच्यासह मुस्लिम समाजातील नागरिक व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उरूस कमेटीच्या वतीने सर्व सहकार्य करणाऱ्या भाविकांचे व नागरिकांचे आभार मानण्यात आले.

 
Top