कळंब (प्रतिनिधी)- जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज (दक्षिण पीठ, नाणीज धाम, महाराष्ट्र) यांच्या प्रेरणेने राज्यभर राबविण्यात येणाऱ्या जीवनदान महाकुंभ (रक्तदान) २०२६ उपक्रमांतर्गत कळंब येथे रक्तदान शिबिर उत्साहात पार पडले. दिनांक ४ते १८ जानेवारी या कालावधीत सुरू असलेल्या या महाअभियानाचा मुख्य उद्देश गरजू रुग्णांसाठी विनामूल्य, सुरक्षित व पुरेसे रक्त उपलब्ध करून देणे हा आहे.
उपजिल्हा रुग्णालय, कळंब येथे ७ जानेवारी रोजी आयोजित या शिबिरात ८३ रक्तदात्यांनी स्वेच्छेने रक्तदान करून सामाजिक बांधिलकीचे भान ठेवले. “तुम्ही जगा, दुसऱ्याला जगवा” हा जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराजांचा संदेश या माध्यमातून प्रत्यक्ष कृतीत उतरल्याचे चित्र दिसून आले.
या रक्तदान शिबिराचे उद्घाटन जगद्गुरु श्रीमद् रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शिवाजी कापसे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नगरसेवक अमर चाऊस, डिकसळ ग्रामपंचायत सदस्य इम्रान मुल्ला, विकास कदम, सतीश आडसूळ यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती.
रक्तसंकलनाचे कार्य धाराशिव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या ब्लड बँकेच्या वतीने करण्यात आले. डॉ. दीपमाला करंडे (रक्तसंक्रमण अधिकारी), लक्ष्मीकांत मुंडे (रक्तपेढी तंत्रज्ञ) यांच्यासह ब्लड बँक व उपजिल्हा रुग्णालयातील कर्मचारी यांनी शिस्तबद्ध, सुरक्षित व नियमानुसार रक्तसंकलन प्रक्रिया पार पाडली.
रक्तदान करणाऱ्या दात्यांना रक्तदान प्रमाणपत्रांचे वितरण ज्येष्ठ नागरिक महासंघाचे जिल्हाध्यक्ष महादेव महाराज अडसूळ, प्राचार्य जगदीश गवळी, माधवसिंग राजपूत, जयनारायण दरक यांच्या हस्ते करण्यात आले. या उपक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराजांचे शिष्यगण, सेवाभावी कार्यकर्ते व स्वयंसेवकांनी विशेष परिश्रम घेतले. यावेळी गरजवंत भक्तांना ब्लँकेट वाटप, तसेच रक्तदात्यांना बिस्किटांचे वितरण जयनारायण दरक यांच्या वतीने करण्यात आले. राज्यभर सुरू असलेल्या जीवनदान महाकुंभ 2026 उपक्रमाला समाजातील विविध स्तरांतून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून या माध्यमातून आरोग्य सेवेस मोठा हातभार लागत असल्याचे चित्र दिसून येत आहे .कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराजांचे शिष्यगण विठ्ठल काटे, कल्याण बोराडे, जीवन चव्हाण, राजेंद्र मुळीक, दत्तात्रय इंगोले, स्वप्नील खिंडकर, रमेश शिंदे, प्रदीप जाधव, प्रमोद कुलकर्णी, अशोक त्रिमुखे, अनिता चव्हाण, अनिता विभुते, सुहासिनी काळे, कोमल जाधव यांनी विशेष परिश्रम घेतले.
