धाराशिव, (प्रतिनिधी)- पीसीपीएनडीटी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होऊन लिंग गुणोत्तराचे प्रमाण सुधारावे व समाजात जनजागृती व्हावी या उद्देशाने धाराशिव जिल्ह्यात तालुकास्तरावर कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले आहे.या उपक्रमांतर्गत आजपर्यंत सात तालुकास्तरीय कार्यशाळा यशस्वीरित्या पार पडल्या असून आज धाराशिव तालुक्याची कार्यशाळा जिल्हा रुग्णालयातील जिल्हा परिचारिका प्रशिक्षण सभागृहात उत्साहात संपन्न झाली.
पीसीपीएनडीटी कायद्याचे महत्त्व, त्याची प्रभावी अंमलबजावणी, गर्भलिंग निदानास प्रतिबंध तसेच लिंग गुणोत्तर सुधारण्याच्या उपाययोजनांवर यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली. या कार्यशाळेत धाराशिव तालुक्यातील सर्व सोनोग्राफी व एमटीपी केंद्रधारक,स्त्रीरोग तज्ज्ञ, शासकीय व खाजगी वैद्यकीय व्यावसायिक,आयएमए व एफओजीएसआयचे पदाधिकारी, तालुक्यातील समुदाय आरोग्य अधिकारी तसेच आशा कार्यकर्त्या सहभागी झाल्या होत्या.
यावेळी मार्गदर्शन करताना जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.धनंजय चाकूरकर यांनी लिंग गुणोत्तर संतुलित राखण्यासाठी विविध उपयोजना राबविण्याचे आवाहन केले तसेच खबरी योजनेद्वारे कायद्याच्या उल्लंघनाची माहिती देण्याबाबत जनजागृती करण्याचे महत्त्व अधोरेखित केले.डॉ.दत्तात्रय खुणे यांनी गावपातळीवर लिंग गुणोत्तर सुधारण्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्याचे आवाहन केले.
पीसीपीएनडीटीचे नोडल अधिकारी डॉ.अनिल चव्हाण यांनी आशा कार्यकर्त्यांकडून तालुकानिहाय लिंग गुणोत्तराचा आढावा घेतला.तर विधी सल्लागार ॲड.रेणुका शेटे यांनी पीसीपीएनडीटी कायद्याच्या तरतुदींची माहिती दिली. या कार्यक्रमास अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.तानाजी लाकाळ, एफओजीएसआयचे अध्यक्ष डॉ. आदिनाथ राजगुरू,आयएमएचे अध्यक्ष डॉ.महेश कानडे,श्री.अमर सपकाळ यांच्यासह संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
पीसीपीएनडीटी कायद्याचे उल्लंघन किंवा गर्भलिंग निदान करणाऱ्याची माहिती देणाऱ्या व्यक्तीस खातरजमा होऊन गुन्हा दाखल झाल्यास राज्य शासनामार्फत एक लाख रुपयांचे बक्षीस दिले जाते व माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवले जाते. यासाठी हेल्पलाईन क्रमांक १८००-२३३-४४७५ / १०४ किंवा www.amchimulgimaha.in या संकेतस्थळावर अथवा नजीकच्या ग्रामीण,उपजिल्हा किंवा जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयात संपर्क साधावा,असे आवाहन डॉ.धनंजय चाकूरकर यांनी केले आहे.
