धाराशिव (प्रतिनिधी)- मध्यवर्ती जिजाऊ जन्मोत्सव समिती, धाराशिव यांच्या वतीने जिजाऊ जयंतीचा 429 वा वर्षोत्सव विविध सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांनी साजरा करण्यात येत आहे. या अनुषंगाने धाराशिव नगरपालिकेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा तसेच नगरसेविकांचा सत्कार कोट गल्ली येथील जंगम मठ येथे उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून सुरेखा जगदाळे, सुरेखा जाधव, डॉ. वैशाली बलवंडे, ॲड. स्मिता कोल्हे, ॲड. अमिता देशमुख, सुनीता साळुंके उपस्थित होत्या.
यावेळी नगराध्यक्षा नेहा काकडे, नगरसेविका कुरेशी मसूद, अलका पारवे, राणी पवार, उबरे सोनाली, गायत्री दंडनाईक, आकांक्षा वाघमारे, आंबेकर रूपाली, राजकन्या पवार, दिपाली पाटील, संगीता अकोसकर, वैशालीताई मुंडे, केशवबाई करवर, देवकते शकुंतला, सोनाली वाघमारे, ज्ञानेश्वरी निकम, पवार वंदना यांचा सत्कार करण्यात आला. नवनिर्वाचित नगराध्यक्षा नेहा राहुल काकडे म्हणल्या की, शहराच्या सर्वांगीण विकासासाठी मी कटिबद्ध आहे. नागरिकांच्या अपेक्षां नुसार विकासकामे प्राधान्याने राबविण्याचा विश्वास व्यक्त केला. यावेळी बोलताना समिती अध्यक्षा प्रणिता पंकज पाटील म्हणाल्या की, पुढील जिजाऊ जयंती जिजामाता उद्यानात भव्य स्वरूपात साजरी करण्यासाठी उद्यानाचा कायापालट करण्यात यावा. तसेच शहराच्या सर्वांगीण विकासासाठी जिजाऊंच्या लेकींनी राजकीय पक्षभेद बाजूला ठेवून एकत्रितपणे काम करावे, असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्ष कमलताई नलावडे यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतात स्त्रीच्या भूमिकेवर मार्गदर्शन करताना सांगितले की, प्रत्येक घरात स्त्रीने स्वतःला केवळ मम्मी न म्हणता आई म्हणून घ्यावे. छत्रपती शिवाजी महाराज जन्माला येत नसतात, तर त्यांना घडवावे लागते. जिजाऊं प्रमाणे प्रत्येक आईने आपल्या मुलाला संस्कारक्षम, धैर्यवान व समाजासाठी आदर्श ठरेल असा घडवावा, असे मत त्यांनी व्यक्त केले. तर आभार प्रदर्शन अस्मिता बुरगुटे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आनंदी पाटील यांनी केले. तसेच जन्मोत्सव समितीचे पदाधिकारी, सदस्य आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
