धाराशिव (प्रतिनिधी)-  मकर संक्रात सण आणि पंतगबाजीचे अनोखे नाते आहे. हा सण जसा जवळ येऊ लागतो तसे बालगोपालांना आणि मोठ्यांनाही वेध लागतात ते पतंगाचे. रंगीबेरंगी विविध आकारातील पतंग उडविणे हा एक वेगळाच आनंद असतो. मात्र या आनंदाच्या भरात आपण सुरक्षीततेकडे दुर्लक्ष करतो. पतंगोत्सव साजरा करताना उत्साहाच्या भरात निष्काळजीपणामुळे आपणास प्रसंगी जीव ही गमवावा लागू शकतो याचे भान राहत नाही. त्यामुळेच पतंग उडविताना पतंग, पतंगाचा मांजा वीज वाहिन्या, रोहीत्र यांच्या संपर्कात आल्याने काही दुर्घटना घडण्याची शक्यता असते. त्यामुळे पतंग उडविताना वीज यंत्रणेपासून सावधगिरी बाळगावी. असे आवाहन महावितरणच्या लातूर परिमंडलाचे मुख्य अभियंता अरविंद बुलबुले यांनी केले आहे.

पतंग उडविताना अपघात घडल्याच्या घटना बातम्यांच्या स्वरुपात आपण दरवर्षी वाचतो. शहरी भागात अपुऱ्या जागे अभावी घराच्या छतावर पतंग उडविताना अनेक जण आपल्याला दिसतात. पतंग उडविण्याच्या नादात आपल्या घराच्या परिसरातील वीजतारांचाही विसर पडतो आणि खबरदारी न घेतल्यामुळे अपघातही होतो. त्याचबरोबर युवकांच्यात वीजतारांमध्ये अडकलेले पतंग काढण्याचीही जणू स्पर्धाच लागलेली असते. अशावेळी शॉक लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे वीजतारांमध्ये अडकलेले पतंग काढण्याचा प्रयत्न करू नये.

वीजतारांमध्ये अडकलेल्या पतंगाचा मांजा खाली जमिनीवर लोंबकळत असतो, हा मांजा ओढून पतंग काढण्याच्या प्रयत्नात एका तारेवर दुसऱ्या तारेचे घर्षण होवून शॉटसर्किट होण्याची शक्यता असते. त्यामुळे संबंधित परिसरात वीजपुरवठा खंडीत होण्याबरोबरच, त्या व्यक्तीचा शॉक लागून प्राणांकीत अपघात होण्याचाही धोका संभवतो. 


 
Top