धाराशिव (प्रतिनिधी)- राज्य निवडणूक आयोगाने 13 जानेवारी 2026 रोजी जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणूक चा कार्यक्रम घोषित केला असून, कार्यक्रम घोषित झाल्याच्या दिनांकापासून आदर्श आचारसंहिता अंमलात आली आहे.त्यामुळे जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया शांततेत,निर्भय व न्याय्य वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीकोनातून,भारत निवडणूक आयोगाच्या आदेश अन्वये दिलेल्या निर्देशांनुसार,कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीकोनातून निवडणूक घोषित झाल्यापासून निकाल जाहीर होईपर्यंत परवाना दिलेली शस्त्रास्त्रे वाहून नेण्यावर निर्बंध लागू झाले आहे.
जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी किर्ती किरण पुजार यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 अन्वये शासकीय कर्तव्य पार पाडणाऱ्या व्यक्ती, दंडाधिकारी शक्ती प्रदान केलेले अधिकारी कर्मचारी तसेच बँकांच्या सुरक्षा व्यवस्थेवरील अधिकारी/कर्मचारी यांच्याव्यतिरिक्त इतर सर्व परवानाधारक व्यक्तींना परवाना दिलेली शस्त्रास्त्रे वाहून नेण्यावर या आदेशान्वये बंदी घालण्यात येत आहे. हे आदेश जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या हद्दीत,निर्गमित झाल्याच्या तारखेपासून 7 फेब्रुवारी 2026 पर्यंत अंमलात राहतील.