धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, उस्मानाबाद व छत्रपती शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय,धाराशिव यांच्या संयुक्त विद्यमाने ‘बालविवाह मुक्त भारत आपला संकल्प अभियान’,पर्यावरण आणि सामुदायिक संरक्षण उपक्रमाविषयी जनजागृती कार्यक्रम छत्रपती शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय,धाराशिव येथे आयोजित करण्यात आला. हा कार्यक्रम जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अध्यक्षा तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अभिश्री देव यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षा तथा विधी सेवा प्राधिकरणच्या सचिव न्यायाधीश भाग्यश्री पाटील यांनी यावेळी मार्गदर्शन करताना सांगितले की, विद्यार्थ्यांनी सकारात्मक विचार करून पुढे जावे,विजयाने उथळ वागू नये आणि पराभवामुळे खचून जाऊ नये.आदर्श नागरिक बनावे.कायदा मला माहित नाही,असे न म्हणता कायद्याचे ज्ञान घ्यावे व ते व्यावहारिक जीवनात पाळावे.मुलीचे वय 18 वर्षे पूर्ण झाल्याशिवाय विवाह करू नये आणि बालविवाहमुक्त भारत निर्माण करण्याचा संकल्प करावा.तसेच पर्यावरण संवर्धन व संरक्षणासाठी प्रयत्नशील राहावे,असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी व्यासपीठावर कार्याध्यक्ष एम. डी. देशमुख,मुख्य न्यायरक्षक ॲड. अमोल गुंड,उपमुख्य न्यायरक्षक ॲड.अभय पाथरूडकर, उपशिक्षणाधिकारी दत्तात्रेय जंगम, विस्तार अधिकारी भारत देवगुडे, प्राचार्य विक्रमसिंह देशमुख आदी मान्यवरांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहशिक्षक आण्णासाहेब कुरुलकर यांनी केले. सूत्रसंचालन सहशिक्षक आनंद वीर यांनी तर फलप्राप्तीचे महत्त्व सांगून आभार प्राचार्य विक्रमसिंह देशमुख यांनी मानले.कार्यक्रमास प्रशालेतील शिक्षक,विद्यार्थी तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
