कळंब (प्रतिनिधी)-  प्रचलित रूढी परंपरा व अंधश्रद्धेला मुठमाती देऊन वडिलांच्या निधनानंतर  नदीच्या पाण्यात रक्षा विसर्जित न करता शेतामध्ये आंब्याचे झाड लावून रक्षा विसर्जित करण्याचा ऐतिहासिक निर्णय रणदिवे परिवाराने घेतल्याने ईटकुर (ता.कळंब) परिसरात त्यांचे कौतुक केले जात आहे.

ज्येष्ठ पत्रकार शिरीषकुमार रणदिवे, ॲड.सतिशकुमार रणदिवे व विजयकुमार रणदिवे यांचे वडील माजी सैनिक अण्णासाहेब गोविंदराव रणदिवे (वय 85)यांचे  शनिवारी (17 जानेवारी 2026) वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांनी भारत पाकिस्तान (1962) युद्धात सेवा बजावली होती. रक्षाविसर्जन नदी पात्रात पाण्यामध्ये परंपरेनुसार करण्याची प्रथा आहे. परंतु नदीचे प्रदूषण होऊ नये. पाणी दूषित होऊ नये. जलचर प्राण्यांना हानी पोहचू नये, पर्यावरणाचा समतोल राखला जावा या उदात्त हेतूने रक्षा विसर्जन पाण्यात न करण्याचा निर्णय रणदिवे परिवाराने घेतला. वडिलांच्या स्मृती कायम स्मरणात राहाव्यात यासाठी शेतामध्ये आंब्याचे झाड लावून रक्षा विसर्जित करण्यात आली. समाजाला या कृतीतून पर्यावरणाचा संदेश दिला आहे. त्यामुळे रणदिवे कुटुंबीयांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

 
Top