धाराशिव (प्रतिनिधी)- आगामी पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रहार दिव्यांग संघटना धाराशिव आणि शिव अर्पण दिव्यांग संघटना धाराशिव यांच्या संयुक्त बैठकीत एक अत्यंत महत्त्वपूर्ण, राजकीयदृष्ट्या निर्णायक आणि दिशादर्शक निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे केवळ राजकीय वर्तुळाचेच नव्हे, तर सर्व इच्छुक उमेदवारांचेही लक्ष दिव्यांग मतदारांकडे केंद्रीत झाले आहे.

या बैठकीत स्पष्ट करण्यात आले की, दिव्यांग मतदार हे कोणत्याही पक्षाचे किंवा उमेदवाराचे उपकाराचे नाहीत, तर ते लोकशाहीचे समान हक्कधारक घटक आहेत. जिल्ह्यातील हजारो दिव्यांग मतदार आता संघटितपणे आपली भूमिका मांडणार असून, त्यांचे मतदान हे केवळ संख्याबळ नसून निर्णय घडवणारी शक्ती ठरणार आहे.

बैठकीत जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांची सखोल चाचपणी करण्यात आली. ज्या पंचायत समिती व जिल्हा परिषद मतदारसंघात संघटनेचे अधिकृत उमेदवार नसतील, त्या ठिकाणी दिव्यांगांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करणाऱ्या, केवळ आश्वासनांवर राजकारण करणाऱ्या कोणत्याही उमेदवाराला पाठिंबा दिला जाणार नाही, असा ठाम निर्णय जाहीर करण्यात आला. संबंधित मतदारसंघातील दिव्यांग शाखेतील सर्व पदाधिकाऱ्यांशी चर्चा करूनच, उमेदवारांनी दिव्यांगांच्या हक्कांबाबत दिलेल्या लेखी, ठोस आणि कालमर्यादित आश्वासनांच्या आधारेच जिल्हा कार्यकारिणीच्या संमतीने पाठिंबा जाहीर केला जाणार आहे.

धाराशिव जिल्हा येथे दिव्यांग संघटनांच्या सुमारे 250 ते 300 सक्रिय शाखा कार्यरत असून, हजारो दिव्यांग मतदार एकसंघपणे मतदान करण्यासाठी सज्ज आहेत. त्यामुळे यापुढे कोणतीही निवडणूक दिव्यांग मतदारशक्तीकडे दुर्लक्ष करून जिंकणे शक्य होणार नाही, हे संघटनांनी ठामपणे स्पष्ट केले. “दिव्यांग मत म्हणजे दया नव्हे, तो आमचा घटनात्मक हक्क आहे. जो उमेदवार दिव्यांगांच्या शिक्षण, रोजगार, आरोग्य, सुविधा आणि सन्मानाच्या हक्कांवर स्पष्ट, ठोस आणि कृतीशील भूमिका घेणार नाही, त्याला दिव्यांग मतदारांचा पाठिंबा मिळणार नाही,” असा थेट आणि स्पष्ट इशारा शिव अर्पण दिव्यांग संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तसेच प्रहारचे जिल्हाध्यक्ष यांनी दिला.

या निर्णयाला जिल्ह्यातील सर्व पंचायत समिती व जिल्हा परिषद प्रतिनिधींची एकमताने संमती देण्यात आली. बैठकीस जिल्हाउपाध्यक्ष बाळासाहेब पाटील, जिल्हा संघटक बाळासाहेब कसबे, उपाध्यक्ष महेश माळी, जिल्हा सचिव महादेव चोपदार, शहराध्यक्ष जमीर शेख यांच्यासह बाबासाहेब भोयटे, सचिन गुरव, धनंजय खांडेकर, कुमार नरवडे, अमोल पांडे, कृष्णा राऊत, समाधान खांडेकर, बळीराम गुरव, संतोष दनाने, महेश गावडे, नानासाहेब वागे, संदिप बारगोले, बप्पा होगले, औदुंबर भणगे, राजेंद्र आकाडे तसेच जिल्हा, तालुका व शहर स्तरावरील असंख्य पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. दिव्यांगांच्या प्रश्नांवर केवळ भाषणबाजी न करता प्रत्यक्ष कृती, ठोस धोरणे आणि वेळेत अंमलबजावणी करणाऱ्या उमेदवारांनाच पाठिंबा दिला जाईल, असा ठाम निर्धार व्यक्त करत, या निवडणुकीत दिव्यांग मतदारशक्ती ही सत्तेची किल्ली ठरणार आहे, असा स्पष्ट संदेश या बैठकीतून देण्यात आला.


 
Top