भूम (प्रतिनिधी)-  डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर व शंकरराव पाटील वरिष्ठ महाविद्यालय, भूम यांच्या वतीने मौजे वालवड, ता. भूम, जि. धाराशिव येथे आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय सेवा योजना युवा शिबिराचा आज उत्साहात समारोप झाला. दिनांक 10 जानेवारी ते 17 जानेवारी 2026 या सात दिवसांच्या कालावधीत युवक जलसंधारण व्यवस्थापन व ओसाड भूमी विकास या विषयावर आधारित विविध सामाजिक, शैक्षणिक व जनजागृतीपर उपक्रम राबविण्यात आले.

समारोप कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून विद्या विकास मंडळ, पाथरूडचे उपाध्यक्ष प्रा. डी. डी. बोराडे हे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शंकरराव पाटील वरिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. अनुराधा जगदाळे या होत्या. यावेळी उपस्थित मान्यवरांनी शिबिरादरम्यान स्वयंसेवकांनी केलेल्या कार्याचे कौतुक केले. प्रमुख पाहुणे प्रा. डी. डी. बोराडे यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधिलकी, नेतृत्वगुण व श्रमप्रतिष्ठा निर्माण होते, असे नमूद केले. जलसंधारण, स्वच्छता, वृक्षारोपण व ग्रामविकासाशी निगडित उपक्रमांमुळे ग्रामीण भागाच्या विकासाला चालना मिळते, असेही त्यांनी सांगितले. अध्यक्षीय भाषणात प्राचार्या डॉ. अनुराधा जगदाळे यांनी विद्यार्थ्यांनी मिळवलेला अनुभव त्यांच्या भावी जीवनात निश्चितच उपयोगी ठरेल, असा विश्वास व्यक्त केला.

या समारोप कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रा. नंदकुमार जगदाळे यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. दिप्ती गिरी यांनी मानले. कार्यक्रमास शंकरराव पाटील वरिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापक, विद्यार्थी तसेच प्राध्यापकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या सातदिवसीय युवा शिबिरामुळे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव वाढीस लागून ग्रामविकास व पर्यावरण संवर्धनाच्या कार्याला निश्चितच बळ मिळेल, असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला.

 
Top