धाराशिव (प्रतिनिधी)- राज्य निवडणूक आयोगाने 13 जानेवारी 2026 रोजी जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक-2026 चा कार्यक्रम जाहीर केल्याने,त्या दिवसापासून आदर्श आचारसंहिता अंमलात आली आहे.निवडणूक प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय्य वातावरणात पार पडावी,या उद्देशाने धाराशिव जिल्ह्यात महत्त्वाचा आदेश जारी करण्यात आला आहे.
निवडणूक कालावधीत जिल्हा परिषद व पंचायत समितींच्या हद्दीत कोणत्याही प्रकारचे जात,धर्म किंवा भाषावार शिबिरे व मेळावे आयोजित केल्यास कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेता,जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी किर्ती किरण पुजार यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 च्या कलम 163 चा वापर करून जिल्ह्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत,म्हणजेच 7 फेब्रुवारी 2026 पर्यंत,कुठेही कोणत्याही प्रकारचे जात,भाषा किंवा धार्मिक शिबिरे व मेळावे आयोजित करण्यावर निर्बंध घातले आहेत.हे आदेश दिनांक 13 जानेवारी ते 7 फेब्रुवारी 2026 या कालावधीत संपूर्ण धाराशिव जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितींच्या हद्दीत लागू राहतील.