धाराशिव (प्रतिनिधी)-  जिल्ह्यात गावपातळीवर आयोजित ग्रामसभेतून तसेच शाळा, महाविद्यालयातून जिल्हा कुष्ठरोग मुक्त करण्यासाठी व्यापक प्रमाणात जनजागृती करा. असे निर्देश जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी दिले.

स्पर्श कुष्ठरोग जनजागृती अभियान 2026 प्रभावीपणे राबविण्याच्या दृष्टीने जिल्हा समन्वय समितीची बैठक जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.या बैठकीला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनाक घोष,जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.धनंजय चाकूरकर,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सतीश हरिदास यांची प्रमुख उपस्थिती होती. 

या बैठकीत स्पर्श कुष्ठरोग जनजागृती अभियानांतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध कृती प्रभावीपणे अंमलात आणण्याबाबत जिल्हाधिकारी पुजार यांनी महत्त्वपूर्ण सूचना दिल्या. स्पर्श कुष्ठरोग जनजागृती मोहिम 2026 चे घोषवाक्य “भेदभाव समाप्त करूया, सन्मानाची वागणूक देऊया” हे आहे. 26 जानेवारी 2026 रोजी जिल्ह्यात होणाऱ्या ग्रामसभांमध्ये आरोग्य शिक्षणाचे कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. 30 जानेवारी 2026 रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा पुण्यतिथी दिन “कुष्ठरोग निवारण दिन” म्हणून साजरा करण्यात येणार आहे. 30 जानेवारी ते 13 फेब्रुवारी 2026 या कालावधीत कुष्ठरोग निवारण पंधरवडा राबविण्यात येणार असून, या पंधरवड्यात आरोग्य शिक्षण कार्यक्रम राबविले जाणार आहेत. शाळांमध्ये प्रार्थनेनंतर कुष्ठरोग प्रतिज्ञेचे वाचन करण्यात येणार आहे. शाळेतील सूचना फलकावर कुष्ठरोगाबाबतचे संदेश लिहिण्यात येणार आहेत.शाळांमध्ये पथनाट्य, प्रश्नमंजुषा स्पर्धा,निबंध स्पर्धा, कुष्ठरोगावरील गाणी, कवितावाचन, रांगोळी स्पर्धा इत्यादी उपक्रम राबविले जाणार आहेत. तसेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनाक घोष यांनी शाळा व महाविद्यालयातून अधिकाधिक जनजागृती करण्याच्या सूचना दिल्या. या बैठकीस सर्व सदस्य उपस्थित होते. या बैठकीची प्रस्तावना डॉ.एम.आर. कोरे, सचिव, जिल्हा समन्वय समिती तथा सहाय्यक संचालक, आरोग्य सेवा (कुष्ठरोग), धाराशिव यांनी केली. 

 
Top