भूम (प्रतिनिधी)- ऊस तोड कामगारांचे जीवन अतिशय वाईट असते. ना कुटुंबाची सोय ,ना खाण्याची ना राहण्याची सोय असते. दिवस रात्र जीवाला धोका आहे असे समजून काम करावे लागते. तसेच या मध्ये सगळ्यात मोठा तोटा मुला बाळांच्या शिक्षणाचा होतो. एक कुटुंबाला जगण्यासाठी ज्या गरजा असतात त्या कधीच पूर्ण होत नसल्याने पिढ्यापिढ्या हजारो कुटुंब या उसतोडीच्या खाईत जीवन जगत आहेत. राज्यात बीड,धुळे,जालना,खानदेश या भागाची ऊसतोड कामगारांसाठी खास ओळख आहे. धाराशिव जिल्ह्यातूनही अनेक लोक ऊसतोडीसाठी जातात. धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यातील बावी गावातील एक बाप आपल्या कुटूंबाच्या पोटाची खळगी भरण्यासाठी धडपड करत असल्याचे चित्र उसाच्या फडात पाहावयास मिळत आहे.
तालुक्यातील बावी येथील सतीश भारत कांबळे हे आपल्या कटुंबाच्या अठरा विश्व दारिद्रयावर मात करण्यासाठी झटत आहेत. तालुक्यातील एका गरीब शेतकरी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. कांबळे कटुंबाच्या संसार वेलीवर काही फुले लागली तोच घरातील कर्त्या महिलेचे निधन झाले. कुटुंबामध्ये सहा मुली व दोन मुले जन्माला आली. मात्र आठवी अपत्य मुलगा झाला आणि त्यामध्येच कांबळे यांच्या कुटुंबाचा घात झाला. बाळंतपण झाल्यानंतर दोन महिन्यांनी म्हणजेच दिनांक 16 डिसेंबर 2019 रोजी कांबळे यांच्या पत्नीचे निधन झाले. पत्नीच्या अचानक जाण्याने घरात पोकळी निर्माण झाली असून, घरात केवळ मुली असल्याने कुटुंबाची सर्व जबाबदारी एकट्याच शेतकऱ्यावर येऊन पडली आहे. श्री कांबळे यांना अवघी दोन ते तीन एकर शेती आहे. पत्नीच्या निधनानंतर स्वतःला सावरत त्यांनी चार मुलींची लग्न केली. तर उर्वरित मुले व मुली शिक्षण घेत आहेत. शेती हा उदरनिर्वाहाचा एकमेव आधार आहे . मात्र यावर्षी अतिवृष्टी झाल्याने संपूर्ण शेतीमध्ये जास्त काळ पावसाचे पाणी राहिल्याने त्यामध्ये पेरणी होऊ शकली नाही. त्यामुळे त्यांनी इयत्ता आठवीच्या वर्गामध्ये शिक्षण घेणाऱ्या मुलीला सोबत घेऊन ऊस तोडीसाठी कारखाना गाठला. तसेच शिक्षण घेणारी मुलीही सुट्टीच्या काळामध्ये येऊन त्यांना मदत करतात. उदरनिर्वाहाचे दुसरे साधन नसल्याने तसेच कुटुंब गाडा चालवण्यासाठी घेतलेल्या कर्जाचा बोजा फेडण्यासाठी त्यांच्याकडे दुसरा पर्याय राहिला नव्हता. त्यांच्याकडे शेतीसाठी आवश्यक असलेली बैलजोडी नसल्यामुळे शेती करणे कठीण झाले आहे. या अडचणीवर मात करण्यासाठी शेतकऱ्याने कर्ज काढून दोन म्हशी विकत घेतल्या. दूध विक्रीतून मिळणाऱ्या तुटपुंज्या उत्पन्नावर संसाराचा गाडा कसाबसा ओढला जात आहे.मात्र वाढती महागाई, मुलींच्या शिक्षणाचा खर्च, घरखर्च आणि शेतीवरील खर्च यामुळे ‘अठरा विश्व दारिद्य्र’ कायम आहे. परिस्थिती काहीशी सुधारावी, कुटुंबाच्या चुलीला धूर राहावा आणि मुलींचे भविष्य सुरक्षित व्हावे, या आशेने हा शेतकरी सध्या ऊस तोडीसाठी भूम तालुक्यातील बाणगंगा साखर कारखान्याच्या क्षेत्रात आपल्या मुलींना सोबत घेऊन बैलगाडीला म्हशी जुंपून धडपड करत आहे. दिवसा कडक उन्हात व रात्री थंडीची पर्वा न करता तो मजुरीचे कठोर काम करत आहे.एकीकडे पत्नीच्या आठवणी, तर दुसरीकडे कुटुंबाची जबाबदारी अशा अवस्थेत हा शेतकरी आयुष्याशी झुंज देत आहे. शासनाच्या योजना, समाजसेवी संस्था आणि दानशूर व्यक्तींनी पुढे येऊन अशा परिस्थितीत सापडलेल्या शेतकरी कुटुंबांना मदतीचा हात दिल्यास त्यांच्या जीवनात दिलासा मिळेल, अशी अपेक्षा नागरिकांतून व्यक्त होत आहे.
