धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक–२०२६ चा कार्यक्रम जाहीर केल्याने १३ जानेवारीपासून आदर्श आचारसंहिता अंमलात आली आहे.निवडणूक प्रक्रिया शांततेत,निर्भय व न्याय्य वातावरणात पार पडावी तसेच सार्वजनिक सुरक्षितता व वाहतूक सुरळीत राहावी,या दृष्टीकोनातून सार्वजनिक ठिकाणी व रस्त्यांवर निवडणूक साहित्य लावण्यावर प्रशासनाने निर्बंध घातले आहेत.राजकीय पक्ष,निवडणूक लढविणारे उमेदवार,त्यांचे प्रतिनिधी किंवा हितचिंतक यांच्याकडून सार्वजनिक इमारतींच्या ठिकाणी किंवा सार्वजनिक रस्त्यांवर निवडणुकीसंबंधी पोस्टर्स,बॅनर्स, पॅम्प्लेट्स,कटआऊट्स,होर्डिंग्ज, कमानी आदी साहित्य लावल्यास रहदारीस अडथळा निर्माण होण्याची तसेच अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.त्यामुळे अशा प्रकारच्या कृतींवर निर्बंध घालणे आवश्यक असल्याने जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी किर्ती किरण पुजार यांनी मुंबई पोलीस अधिनियम १९५१ च्या कलम ३३ (१)(डीबी) अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून हे आदेश निर्गमित केले आहेत.
या आदेशानुसार,निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत,म्हणजेच दिनांक ७ फेब्रुवारी २०२६ पर्यंत,कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी किंवा सार्वजनिक रस्त्यावर रहदारीस अडथळा होईल किंवा अपघात होण्याची शक्यता निर्माण होईल अशा पद्धतीने कोणतेही निवडणूक साहित्य लावण्यास निर्बंध घालण्यात आले आहेत.हे आदेश दिनांक १३ जानेवारी २०२६ ते दिनांक ७ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत संपूर्ण धाराशिव जिल्ह्यात अंमलात राहतील.