धाराशिव  (प्रतिनिधी)- शीख धर्माचे 9 वे गुरु श्री गुरू तेग बहादूर साहिब जी यांनी 17 व्या शतकात तेव्हाच्या शासनकर्त्यांच्या अन्याय व अत्याचाराविरुद्ध आवाज उठवला.त्यांनी मानवी हक्कांसाठी बलिदान देऊन देशाच्या सांस्कृतिक व आध्यात्मिक अस्मितेचे रक्षण केले. त्यांच्या 350 व्या शहीदी समागम शताब्दी वर्षानिमित्त त्यांचा गौरवशाली इतिहास माहीत व्हावा, त्यांनी केलेला प्रचार व दिलेले बलिदान याचे स्मरण होण्यासाठी त्यांचे विचार समाजातील विविध घटकांपर्यंत पोहोचवण्यासाठी जिल्ह्यात विविध कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात यावे.असे आवाहन जिल्हास्तरीय समितीचे नोडल अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी विद्याचरण कडवकर यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या कक्षात हिंद- दि- चादर श्री गुरु तेग बहादूर साहिब जी यांच्या 350 व्या शहीद समागम शताब्दी वर्षानिमित्त आयोजित जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीत श्री कडवकर बोलत होते.या बैठकीला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.शैलेंद्र चौहान,अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.तानाजी लाकाळ,जिल्हा अल्पसंख्यांक अधिकारी पुंडलिक गोडसे,जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे,जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) अनंत कुंभार,अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.व्ही.व्ही.कुलकर्णी,उपशिक्षणाधिकारी दत्तात्रय लांडगे,पोलीस निरीक्षक श्री. भुजबळ,मोटार वाहन निरीक्षक विकास डोंगरे व बहुजन कल्याण विभागाचे व्ही.एच.राठोड यांची प्रमुख उपस्थिती होती.

कडवकर म्हणाले की.श्री गुरु तेग बहादूर साहीब जी यांच्या जीवन कार्यावर शाळा,विद्यालय आणि महाविद्यालयस्तरावर निबंध स्पर्धा व वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात याव्यात.स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना मुख्यमंत्री,पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.या आयोजनासाठी शिक्षण विभाग व विद्यापीठाच्या धाराशिव येथील उपकेंद्रने पुढाकार घेऊन जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना सहभागी करून घ्यावे तसेच श्री गुरु तेग बहादूर साहीब जी यांच्या जीवन कार्यावर चित्ररथाच्या माध्यमातून माहिती देण्यात येणार आहे.जिल्ह्यातील चित्रपटगृहातून गायक सरताज यांचे गीत दाखविण्यात येणार आहे.तसेच त्यांच्या जीवनावर आधारित माहितीपट दाखविण्यात येणार आहे असे श्री.कडवकर यांनी यावेळी सांगितले.

श्री गुरु तेग बहादूर साहिब जी यांचे इतर समाजाची असलेले जिव्हाळ्याचे संबंध या विषयावर पथनाट्यांचे शाळा व विद्यालयस्तरावर आयोजन करण्यात यावे असे सांगून श्री. कडवकर म्हणाले की,शाळास्तरावर प्रभात फेरी काढण्यात यावी. जिल्ह्यात असलेल्या शीख, सिकलीकर,बंजारा- लबाना, मोहियाल,सिंधी व इतर समाजापर्यंत हिंद दि चादर श्री गुरु तेग बहादुर साहीब जी यांचे विचार पोहोचविण्याचे काम विविध कार्यक्रमातून करण्यात यावे.नांदेड येथे 24 व 25 जानेवारी रोजी आयोजित 350 व्या शहिदी समागम शताब्दी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमाला जाण्यासाठी इच्छुक असलेल्या जिल्ह्यातील समाज बांधवांसाठी आरटीओ विभागाने दानशूर व्यक्ती किंवा सीएसआरच्या माध्यमातून वाहनाची व्यवस्था तसेच लंगर,पाणी व्यवस्था करण्यात यावी. धाराशिव येथील आरोग्य विभागाने नांदेड येथे वैद्यकीय अधिकारी- कर्मचारी व रुग्णवाहिकेसह आपले पथक पाठवण्याची व्यवस्था करावी असे ते यावेळी म्हणाले.


 
Top