धाराशिव (प्रतिनिधी)- भारतीय जनता पक्षाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य तसेच रुपामाता उद्योग समूह, धाराशिवचे संस्थापक व मार्गदर्शक अँड. व्यंकटराव गुंड पाटील यांचा वाढदिवस दिनांक 5 जानेवारी रोजी अत्यंत उत्साहात व प्रचंड जनसाक्षीने साजरा करण्यात आला. समाजाच्या विविध स्तरांत त्यांचे असलेले योगदान, कार्यपद्धती व नेतृत्व यामुळे वाढदिवसानिमित्त जिल्हाभरातून नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती.

या प्रसंगी जिल्ह्यातील राजकीय, सामाजिक, औद्योगिक, शैक्षणिक, साहित्यिक व धार्मिक क्षेत्रातील मान्यवर, विविध संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकरी, कामगार, विद्यार्थी तसेच पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. कार्यक्रमाला जि.प. धाराशिवचे माजी उपाध्यक्ष सुधाकर गुंड गुरुजी, ह.भ.प. पांडुरंग महाराज लोमटे, ह.भ.प. बाबुराव पुजारी यांच्यासह अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली.

वाढदिवसाचे औचित्य साधून रुपामाता उद्योग समूहाच्या प्रधान कार्यालयात सामाजिक बांधिलकी जपत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन कार्यकारी संचालक अँड. अजित गुंड  व अँड. शरद गुंड यांच्या हस्ते करण्यात आले. शिबिरास नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून मोठ्या संख्येने रक्तदात्यांनी सहभाग नोंदवून सामाजिक दायित्वाची भावना अधोरेखित केली.

याचबरोबर वाढदिवस साजरा करताना सामाजिक व शैक्षणिक उपक्रमांना प्राधान्य देण्यात आले. संत ज्ञानेश्वर विद्यालय, लासोना येथील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व खाऊचे वाटप करण्यात आले. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्राथमिक विद्यालय, पाडोळी (आ.) येथे निबंध लेखन व सामान्य ज्ञान स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धांमुळे विद्यार्थ्यांमध्ये अध्ययनाची गोडी, स्पर्धात्मक वृत्ती व आत्मविश्वास वाढण्यास हातभार लागला.

अखेर, रुपामाता अर्बन व मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह संस्थेच्या मुख्य कार्यालयात अभिष्टचिंतनाचा कार्यक्रम संपन्न झाला. मान्यवरांच्या उपस्थितीत केक कापून वाढदिवसाचे औचित्य साजरे करण्यात आले. यावेळी उपस्थित नागरिक, कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी अँड. व्यंकटराव गुंड पाटील यांचा सत्कार करत त्यांच्या सामाजिक, औद्योगिक व सार्वजनिक जीवनातील कार्याचा गौरव केला.

कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी सर्व उपस्थितांनी अँड. व्यंकटराव गुंड पाटील यांच्या उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य तसेच उद्योजकीय व राजकीय क्षेत्रातील यशस्वी वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा व्यक्त केल्या. वाढदिवस केवळ वैयक्तिक उत्सव न राहता सामाजिक उपक्रमांनी परिपूर्ण ठरल्याने या सोहळ्याचे सर्वत्र कौतुक करण्यात आले.

 
Top