कळंब (प्रतिनिधी)- येथील श्री बालाजी मंदिरात कळंबचे तहसीलदार हेमंत ढोकले व ॲड माधवी ढोकले यांच्या हस्ते भगवान श्री व्यंकटेश यांचा शुक्रवार महाअभिषेक संपन्न झाला. निमित्त होते वाढदिवसाचे विशेष म्हणजे तहसीलदार पती-पत्नीचा वाढदिवस एकाच दिवशी आहे. पहाटे पाच वाजता श्री गणेश पूजा ,विश्वसेन आराधना आणि नवग्रह पूजा करून दूध दही, लोणी,साखर, मध ,तूप आदी पंचामृत ने श्री बालाजी भगवान यांचा अभिषेक विधी मंदिराचे पुजारी श्री राम प्रपन्नाचार्य महाराज यांच्या मंत्रोच्चारात करण्यात आला.
नुकतेच श्री बालाजी मंदिरात झालेल्या वैकुंठ एकादशी आणि कल्याण उत्सव यांच्या बातम्या आणि व्हिडिओ पाहून तहसीलदारांना मंदिरास भेट देण्याची इच्छा झाली आणि श्री वेंकटेशाच्या भक्तीने वाढदिवस साजरा करण्याचा योग घडून आला. दाक्षिणात्य पद्धतीचे मंदिर बांधकाम , तिरुपती येथील खुद्द बालाजी देवस्थानाची मूर्ती आणि नित्य नियमित होत असलेले पूजा उपचार याने ते भारावून गेले. जन्मदिवस ,लग्नाच्या वाढदिवस किंवा अन्य औचित्य साधून मंदिरामध्ये दररोज भक्तांमार्फत आरती आणि प्रसादाचे आयोजन केले जाते . याप्रमाणे सर्वच बालाजी भक्तांना अभिषेक, आरती प्रसादाची संधी दिली जाते ,याचे कौतुक तहसीलदारांनी केले. यावेळी मा.तहसीलदारांचा शाल,श्रीफळ देऊन या यथोचित सन्मान करण्यात आला. समाजसेवे सोबत आध्यात्मिक जोड असलेले तहसीलदार कळंबला लाभले ,यासाठी बालाजी भक्तांकडून आनंद व्यक्त करण्यात आला.
