धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीसाठी दाखल झालेल्या नामनिर्देशन पत्रांची छाननी गुरुवारी (दि. 22 जानेवारी) उशिरापर्यंत सुरू होती. जिल्ह्यातील सर्वच गट व पंचायत समितीच्या सर्व गणांमध्ये मोठ्या प्रमाणावर उमेदवारी अर्ज दाखल झाल्यामुळे प्रत्येक तालुक्यात छाननी प्रक्रिया वेळखाऊ ठरली.

धाराशिव जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या एकूण 55 गटांसाठी 967 उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. यावर्षी बहुतेक उमेदवारांनी अर्ज भरताना आवश्यक कागदपत्रांची विशेष दक्षता घेतली असली, तरी छाननी प्रक्रियेदरम्यान 27 उमेदवारांचे अर्ज अवैध ठरवण्यात आले. तसेच 2 उमेदवारांचे अर्ज हरकतीच्या सुनावणीसाठी राखून ठेवण्यात आले आहेत. छाननीनंतर जिल्हा परिषदेच्या 55 गटांसाठी सध्या 938 उमेदवारी अर्ज वैध ठरले आहेत. तालुकानिहाय पाहता, धाराशिव तालुक्यात सर्वाधिक 17 उमेदवारी अर्ज अवैध ठरले.

त्यानंतर कळंब व भूम तालुक्यात प्रत्येकी 4 अर्ज बाद झाले. तर उमरगा आणि तुळजापूर तालुक्यात प्रत्येकी 1 अर्ज अवैध ठरवण्यात आला. परंडा, वाशी आणि लोहारा तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या एकही उमेदवारी अर्जाला छाननीत आक्षेप नोंदवण्यात आलेला नाही, ही बाब विशेष ठरली आहे.

दरम्यान, जिल्ह्यातील 8 पंचायत समितींच्या एकूण 110 गणांसाठी 1,360 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. त्यापैकी छाननी प्रक्रियेत 38 अर्ज अवैध ठरवण्यात आले असून, 1321 अर्ज वैध ठरेल आहेत. 1 अर्ज हरकतीच्या मुदतीवर राखून ठेवण्यात आला आहे. पंचायत समिती छाननीतही धाराशिव तालुक्यात सर्वाधिक 19 अर्ज अवैध ठरले. त्याखालोखाल तुळजापूर तालुक्यात 7, तर उमरगा व भूम तालुक्यात प्रत्येकी 3 अर्ज अवैध ठरवण्यात आले. वाशी, लोहारा आणि कळंब तालुक्यात प्रत्येकी 2 अर्ज अवैध झाले, तर परंडा तालुक्यात पंचायत समितीसाठी एकही अर्ज अवैध ठरवण्यात आलेला नाही. विशेष म्हणजे परंडा तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी दाखल झालेले सर्वच उमेदवारी अर्ज छाननीत वैध ठरले आहेत.

आजपासून उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या प्रक्रियेस सुरुवात झाली आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत दिनांक 27 जानेवारी रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत आहे. मात्र 25 जानेवारी (रविवार) आणि 26 जानेवारी (प्रजासत्ताक दिन) या दोन दिवसांमध्ये शासकीय सुट्टी असल्यामुळे या कालावधीत अर्ज मागे घेता येणार नाहीत. त्यामुळे प्रत्यक्षात उमेदवारांकडे केवळ तीनच दिवस उपलब्ध असणार आहेत. या मर्यादित कालावधीत युती, आघाडी तसेच स्थानिक पातळीवरील राजकीय चर्चा व तडजोडींना वेग येण्याची शक्यता आहे. 27 जानेवारी रोजीच दुपारी साडेतीन वाजता निवडणूक लढवणाऱ्या अंतिम उमेदवारांची यादी निवडणूक विभागाकडून प्रसिद्ध केली जाणार असून, त्याच दिवशी उमेदवारांना निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात येणार आहे. त्यामुळे पुढील तीन दिवसांत धाराशिव जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापणार असल्याचे चित्र दिसत आहे.


 
Top