धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक चा कार्यक्रम जाहीर केल्याने 13 जानेवारीपासून आदर्श आचारसंहिता अंमलात आली आहे.निवडणूक प्रक्रिया शांततेत,निर्भय व न्याय्य वातावरणात पार पडावी,या उद्देशाने उमेदवारांनी नामनिर्देशन दाखल करताना अवलंब करावयाच्या कार्यपद्धतीबाबत जिल्हा प्रशासनाने महत्त्वाचे आदेश निर्गमित केले आहेत.
निवडणूक कालावधीत उमेदवारांनी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात नामनिर्देशनपत्र दाखल करताना वाहनांच्या ताफ्यामध्ये तीनपेक्षा जास्त मोटारगाड्या, मोटारसायकल किंवा इतर वाहने समाविष्ट करू नयेत.तसेच नामनिर्देशनपत्र दाखल करताना निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या दालनात जास्तीत जास्त पाच व्यक्तींनाच उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली आहे. याव्यतिरिक्त कोणालाही दालनात प्रवेश दिला जाणार नाही.
तसेच निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात नामनिर्देशनपत्र दाखल करताना कार्यालयाच्या परिसरात कोणत्याही प्रकारची मिरवणूक अथवा सभा घेणे,घोषणा देणे,वाद्य वाजविणे,गाणी म्हणणे किंवा कोणत्याही स्वरूपाचा निवडणूक प्रचार करण्यावरही पूर्णतः प्रतिबंध घालण्यात आला आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी तसेच निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी हे निर्बंध आवश्यक आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी किर्ती किरण पुजार यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 च्या कलम 163 अन्वये हे आदेश दिले आहेत. या आदेशानुसार,निवडणूक कालावधीत उमेदवारांनी नामनिर्देशनपत्र दाखल करताना निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयाच्या 100 मीटर परिसरात तसेच दालनात पाच व्यक्तींव्यतिरिक्त कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही. हे आदेश दिनांक 13 जानेवारी 2026 ते दिनांक 7 फेब्रुवारी 2026 या कालावधीत संपूर्ण धाराशिव जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितींच्या हद्दीत लागू राहतील.