धाराशिव (प्रतिनिधी)- पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक 37 मधून शिवसेनेकडून उमेदवार असलेल्या माजी मंत्री व आमदार प्रा. डॉ. तानाजी सावंत यांचे चिरंजीव गिरीराज सावंत यांचा धक्कादायक पराभव झाला आहे. भाजपाचे उमेदवार अरुण भगवान राजवाडे यांनी गिरीराज सावंत यांचा पराभव करत प्रभागावर भाजपाचा झेंडा फडकावला आहे.
या निवडणुकीत गिरीराज सावंत हे विजयाचे प्रबळ दावेदार मानले जात होते. सावंत कुटुंबाचे राजकीय वजन, शिवसेनेची संघटनात्मक ताकद आणि प्रा. डॉ. तानाजी सावंत यांचा प्रदीर्घ राजकीय अनुभव लक्षात घेता हा प्रभाग शिवसेनेकडेच जाईल, अशी चर्चा होती. मात्र प्रत्यक्ष निकालाने सर्वच अंदाज फोल ठरवत सावंत कुटुंबाला मोठा धक्का दिला आहे. गिरीराज सावंत यांनी पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या माध्यमातून राजकीय सुरू केली होती.
मात्र त्यांना पहिलाच निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला आहे. गिरीराज सावंत हे भाजपचे माजी आमदार दिवंगत लक्ष्मण जगताप यांचे जावई आहेत. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत लक्ष्मण जगताप यांचे बंधू आमदार शंकर जगताप यांनी स्वबळावर भाजपाचा झेंडा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेवर फडकवला आहे. मात्र त्यांचे जावई गिरीराज सावंत हे पराभूत झाले आहेत. शिवसेना पक्षाचे उपनेते व माजी मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांच्यासाठी हा पराभव राजकीयदृष्ट्या धक्कादायक मानला जात आहे.