उमरगा (प्रतिनिधी)- पंचायत समितीचे सभापतीपद अनुसुचित जातीसाठी राखीव झाले आहे. महायुतीसह महाविकास आघाडीचे अनेक इच्छुक दंड थोपटून तयार आहेत. भाजपाचे कैलास शिंदे यांनी भुसणी गणातुन तर शिवसेनेच्या (शिंदे) कु. आकांक्षा चौगुले यांनी कवठा गणातुन चाचपणी सुरू केली आहे. यामुळे सभापती पदासाठी महायुतीच्या दोन पक्षात चुरस असल्याचे दिसून येत आहे. महाविकास आघाडीने अद्याप आपले पत्ते उघडलेले नाहीत.
उमरगा तालुक्यात जिल्हा परिषदेच्या 9 तर पंचायत समितीच्या 18 जागा आहेत. जिल्हा परिषद, पंचायत समिती या सारख्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका म्हणजे ग्रामीण भागात स्थानिक पातळीवर राहून पक्ष, संघटनेचे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना राजकारण व समाजकारण करण्याची संधी असते. गावागावांमध्ये आपले व्यवसाय, शेती सांभाळत असे कार्यकर्ते पक्षांचे काम करत असतात. ‘मिनी मंत्रालय’ अशी ओळख असणाऱ्या जिल्हा परिषदेच्या रुपाने जिल्ह्याची सत्ता ताब्यात ठेवण्यासाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. कार्यकाल संपलेल्या जिल्हा परिषदेत उमरगा तालुक्यातून कॉग्रेसचे 5 सदस्य होते. यापैकी चौघांनी माजी मंत्री बसवराज पाटील यांच्या नेतृत्वाखाली भाजपात प्रवेश केला आहे. तसेच पूर्वीच भाजपाचे 2 सदस्य होते. तर शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रत्येकी एक जिल्हा परिषद सदस्य होते.
उमरगा पंचायत समितीचे सभापती पद अनुसुचित जातीसाठी राखीव आहे. तालुक्यातील अनुसुचित जातीसाठी भुसणी तर अनुसूचित जाती महिलांसाठी केसरजवळगा व कवठा हे गण राखीव आहेत. यापैकी निवडुन येणाऱ्या सदस्याला सभापती पदाचा मान मिळणार आहे. त्यामुळे सर्वपक्षीय इच्छुकांचा डोळा या तीनच मतदारसंघावर आहे. या जागेसाठी शिवसेनेचे माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांची कन्या, ज्ञानज्योती सामाजिक संस्थेचे संस्थेच्या अध्यक्षा कु. आकांक्षा चौगुले यांना शिवसेनेकडून कवठा गणातुन उमेदवारी देण्याची मागणी होत आहे. भारतीय जनता पक्षात नेत्यांची मोठी टीम व मोठा जनाधार असलेला पक्ष आहे. भाजपात इच्छुकांची भाऊगर्दी असली तरी समाजाचा चेहरा म्हणून कैलास शिंदे यांनी भुसणी पंचायत समिती मतदारसंघातुन निवडणुक लढवणेस इच्छुक असल्याचे समजते. भाजपाकडून सभापती पदाचे कैलास शिंदे हेच प्रबळ दावेदार आहेत. शिवसेना (ठाकरे) व काँग्रेसकडून कोण तुल्यबळ उमेदवार नजरेस येत नसले तरी ऐनवेळी शिवसेना (ठाकरे) विधानसभेचा पॅटर्न राबवणार का ? कॉग्रेसच्या अनेकांनी विधानसभा निवडणुक लढवण्याची तयारी केली होती. मात्र शिवसेना (ठाकरे) ला जागा सुटल्याने त्यांचा हिरमोड झाला आहे. आता सभापती पद अनुसुचित जातीसाठी सुटल्याने मिनी आमदार म्हणून तालुक्याचे सभापतीपद बुजवण्यासाठी कोण इच्छुक आहे हे अद्याप स्पष्ट नाही. राष्ट्रवादी (अप) नेतृत्व भारतीय जनता पक्षासोबत जुळवून घेण्यासाठी इच्छुक आसल्याचे दिसून येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शप) ची कोणासोबत समेट होणार, मनसे व वंचित बहुजण आघाडी कोणती भूमिका घेणार हे त्या त्या वेळी स्पष्ट होणार आहे.