धाराशिव (प्रतिनिधी)-  18 लाख 95 हजार 880 रुपयांचा सागर 2000 पान मसाला व टाटा टेम्पो वाहन असा एकूण 33 लाख 95 हजार 880 रुपयांचा मुद्देमाल स्थानिक गुन्हे शाखेने जप्त करून जालना जिल्ह्यातील व्यक्तीवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी की, जिल्ह्यातील गुटखा विक्री करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याबाबत आदेशित केले होते. त्यामुळे स्थानिक गुन्हे शाखेचे पथक हे गस्त करीत असताना त्यांना धुळे-सोलापूर महामार्गावर एक टाटा टेम्पो वाहन महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला पान मसाला घेऊन धाराशिवच्या दिशेने जात आहे, अशी गोपनीय माहिती प्राप्त झाली. त्यानुसार पथकाने तात्काळ महामार्गावर गस्त केली असता त्यांना तेरणा इंजिनिअरिंग कॉलेज, धाराशिव या ठिकाणी सदरचे वाहन दिसून आले. सदर वाहन चालकाला पोलिसांचा संशय आल्याने त्याने वाहन वेगाने चालवण्यास सुरुवात केली. सदर वाहन चालकास पकडण्यासाठी आनंदनगर पोलीस ठाण्याच्या पथकास सांगण्यात आल्यामुळे डी मार्ट धाराशिवच्या समोर सदर वाहन आढवून चौकशी केली असता दीपक दिगंबर पुरी, रा. शिरपूर, तालुका मंठा, जिल्हा जालना असे असल्याचे सांगितले. नमूद वाहनात सागर 2000 हा प्रतिबंधित पान मसाला असल्याचे सांगितले. पोलिसांनी पंचनामा करून 18 लाख 95 हजार 880 रुपयांचा सागर 2000 पान मसाला व टाटा टेम्पो वाहन असा एकूण 33 लाख 95 हजार 880 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. वाहन चालकाविरुद्ध आनंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील कारवाई कामी सदरचा मुद्देमाल व आरोपी आनंद नगर पोलिस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आला आहे.

सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक रितु खोखर, अपर पोलीस अधीक्षक शफकत आमना यांचे मार्गदर्शनाखाली पोनि विनोद इज्जपवार, सपोनि सुदर्शन कासार, स्थानिक गुन्हे शाखेचे,पोलीस हवालदार शौकत पठाण, जावेद काझी, प्रकाश औताडे, फरहान पठाण, चालक रत्नदीप डोंगरे आणि आनंद नगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक खांडेकर, सपोनी परमेश्वर सोगे व पथक यांनी केली आहे.

 
Top