कळंब (प्रतिनिधी)- जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या प्रेरणा व मार्गदर्शनाखाली गुजरात राज्यातील वलसाड जिल्ह्यात 312 कुटुंबांचा विधिवत हिंदू धर्मात पुनर्प्रवेश सोहळा पार पडला. धरमपूर तालुक्यातील हनुमंतमाळ येथे झालेल्या या भव्य आणि भावनिक सोहळ्यात सनातन हिंदू परंपरेनुसार धार्मिक विधी पार पाडण्यात आले.
विविध आमिषे, फसवणूक व भुलथापांमुळे पूर्वी अन्य धर्मात गेलेली ही कुटुंबे आत्मपरीक्षण करून पुन्हा आपल्या मूळ सनातन हिंदू धर्मात परतली. या सोहळ्यामुळे उपस्थितांमध्ये भक्ती, श्रद्धा आणि आत्मिक समाधानाचे वातावरण निर्माण झाले होते.
जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या या महाअभियानांतर्गत आतापर्यंत 1,53,343 कुटुंबांनी हिंदू धर्मात पुनर्प्रवेश केला असल्याची माहिती देण्यात आली. गरिबी, अज्ञान व परिस्थितीचा गैरफायदा घेत नियोजनबद्ध पद्धतीने धर्मांतरण केलेल्या हिंदू बांधवांना पुन्हा आपल्या धर्मात सन्मानाने सामावून घेण्याचे हे कार्य सातत्याने सुरू आहे. या पुनर्प्रवेश सोहळ्यात गोमाता पूजन, होम-हवन आदी धार्मिक विधी तीन तास चालले. यानंतर सर्व उपस्थित कुटुंबांना जगद्गुरुंच्या हस्ते शपथ देण्यात आली.
“मी यापुढे हिंदू धर्माची उपासना, रीतिरिवाज, प्रथा व परंपरांचे तंतोतंत पालन करेन. कोणत्याही परिस्थितीत अन्य धर्म स्वीकारणार नाही. मी जन्माने हिंदू आहे आणि हिंदू म्हणूनच जीवन व्यतीत करीन.”शपथविधीनंतर जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितले.“मिशनऱ्यांकडून विविध आमिषे दाखवून विशेषतः आदिवासी बांधवांचे धर्मांतरण केले जाते. धर्म बदलूनही त्यांची मूळ नावे, जात आणि कागदोपत्री धर्म बदलला जात नाही, जेणेकरून शासकीय सवलती मिळत राहतील. हिंदू धर्मातील उपासना पद्धती बदलल्याने अपराधी वाटणारी अनेक मंडळी आमच्याकडे आली, म्हणून त्यांना पुन्हा पूर्वीची उपासना पद्धती स्वीकारण्याचा मार्ग आम्ही खुला करून दिला. या कार्यक्रमास धरमपूरचे आमदार अरविंदभाई पटेल, अहवा-डांगचे आमदार विजयभाई पटेल, उमरगामचे आमदार रमणभाई पाटकर, जिल्हा महामंत्री महेंद्र चौधरी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. सनातन हिंदू संस्कृतीचे जतन, संरक्षण व जागृतीसाठी सुरू असलेले हे कार्य समाजात नवचैतन्य निर्माण करणारे ठरत असल्याची भावना यावेळी उपस्थितांनी व्यक्त केली.
