धाराशिव (प्रतिनिधी)- सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत देण्यात येणाऱ्या भारत सरकार शिष्यवृत्ती,शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती,राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती तसेच व्यावसायिक पाठ्यक्रमात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना देण्यात येणारा निर्वाह भत्ता इत्यादी योजनांसाठी सन 2025- 26 या शैक्षणिक वर्षाकरिता अर्ज भरण्याची प्रक्रिया http://mahadbtmahit.gov.in या संकेतस्थळावर दिनांक 1 जुलै 2025 पासून सुरू करण्यात आलेली आहे.

त्यानुषंगाने महाडीबीटी प्रणालीवरील डॅशबोर्डचे अवलोकन केले असता सन 2025- 26 करिता एकूण 5943 विद्यार्थ्यांनी अर्ज भरले असून त्यापैकी 1764 अर्ज हे महाविद्यालय स्तरावर प्रलंबित असल्याचे निदर्शनास आले आहे.याबाबत महाविद्यालयांना वेळोवेळी निर्देश देण्यात आले असले तरी अद्याप अनेक महाविद्यालयांच्या प्राचार्यांनी अर्जांची पडताळणी करून ते सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालयाकडे सादर केलेले नाही.तरी सर्व महाविद्यालयांनी ऑनलाईन प्राप्त झालेल्या अर्जांची शासन निर्णयातील निकषांनुसार परिपूर्ण छाननी करून पात्र अर्ज तात्काळ समाज कल्याण कार्यालयाकडे अग्रेषित करावेत,असे निर्देश देण्यात आले आहेत.

तसेच सन 2024- 25 च्या तुलनेत सन 2025- 26 मध्ये अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे महाडीबीटी प्रणालीवरील शिष्यवृत्ती अर्ज नोंदणीचे प्रमाण कमी असल्याचे दिसून येत आहे.त्यामुळे ज्या महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी अद्याप शिष्यवृत्ती अर्ज भरलेले नाहीत अशा विद्यार्थ्यांना महाविद्यालयस्तरावरून सूचित करून अर्ज भरण्यास प्रवृत्त करण्यात यावे.

विहित मुदतीत अर्ज निकाली न काढल्याने अथवा अर्ज न भरल्यामुळे अनुसूचित जाती प्रवर्गातील एखादा विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहिल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित महाविद्यालयाच्या प्राचार्यांची व विद्यार्थ्याची राहील,याची गांभीर्यपूर्वक नोंद घ्यावी,असे आवाहन सहाय्यक आयुक्त समाज कल्याण,धाराशिव श्री.सचिन कवले यांनी केले आहे.

 
Top