भूम (प्रतिनिधी)-  दिनांक 2 डिसेंबर रोजी भूम नगर परिषदेच्या निवडणुकीचे मतदान झाल्यानंतर उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार निकाल लांबणीवर गेला असून दिनांक 21 डिसेंबर रोजी मतमोजणी होऊन नगरपरिषदेचा निकाल जाहीर होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस प्रशासनाच्या वतीने नगर परिषद निवडणुकीसाठी उभे असलेल्या सर्व उमेदवारांना भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम 168 नुसार नोटीस बजावत सूचना देण्यात आल्या आहेत. 

निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केल्यापासून आजतागायत संपूर्ण निवडणूक कालावधीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाच्या वतीने योग्य ती खबरदारी घेतली असून यापुढील काळात म्हणजेच निकालाच्या दिवशी देखील शहरातील कायदा व सुव्यवस्था बिघडू नये व शांतता रहावी यासाठी ही नोटीस दिली असल्याचे पोलीस निरीक्षक गणेश कानगुडे यांनी सांगितले. या नोटीस द्वारे उमेदवारांना कळविण्यात आले आहे की, मतमोजणी प्रक्रिया पार पडल्यानंतर विजयी झाल्यानंतर कोणत्याही प्रकारची विजयी मिरवणूक अथवा रॅली काढू नये. मिरवणूक काढल्यास दोन गटात वाद निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. 

निवडणूक आयोगाने लागू केलेल्या आदर्श आचारसंहितेचे आणि पोलीस प्रशासनाच्या वतीने वेळोवेळी जारी करण्यात येणाऱ्या सर्व आदेशाचे व नियमांचे काटेकोरपणे आणि जबाबदारीने पालन करावे. नोटीसमध्ये नमूद केलेल्या सूचनांचा भंग झाल्यास किंवा शांतता भंग झाल्यास संबंधित उमेदवार, कार्यकर्ते यांच्या विरोधात सदरील नोटीसला पुरावा ग्राह्य धरून दखलपात्र, अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे नोटीस द्वारे सांगण्यात आले आहे.

 
Top