तुळजापूर (प्रतिनिधी)-  तीर्थक्षेत्र तुळजापूर येथे शनिवार, रविवारच्या सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असून, या गर्दीच्या तुलनेत श्री तुळजाभवानी मंदिरातील दर्शन व्यवस्थेचे नियोजन अपुरे पडत असल्याचे चित्र दिसून येत आहे. सशुल्क दर्शनासाठी पैसे मोजूनही भाविकांना वेळेत व सुलभ दर्शन मिळत नसल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

शनिवार, दिनांक 13 डिसेंबर रोजी दुपारच्या सत्रात दर्शनासाठी प्रचंड गर्दी झाली होती. पाचशे रुपयांचे सशुल्क दर्शन पास काढणाऱ्या भाविकांना सुमारे दीड तास तर दोनशे रुपयांचे सशुल्क दर्शन पासधारकांना अडीच ते तीन तास प्रतीक्षा करावी लागली. धर्मदर्शनासाठी आलेल्या भाविकांना साडेतीन ते चार तास तर मुखदर्शनासाठीही दीड तासाच्या आसपास वेळ लागत असल्याचे दिसून आले. एवढा वेळ रांगेत थांबूनही भाविकांना अपेक्षित सुलभ दर्शन मिळत नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे. वाढत्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर मंदिर समितीने प्रभावी नियोजन करणे आवश्यक होते. मात्र ते न झाल्याने याचा थेट फटका भाविकांना बसत असल्याचे बोलले जात आहे. मंदिर अधिकारी ऑफिसमध्ये बसून नियोजन करत असल्याने मंदिर गर्भग्रहात प्रचंड भेदभाव होत आहे. याची दखल कुणीही घेत नसल्याने व मंदिरातील नियमाचे भंग सातत्याने होत असतानाही त्याची दखल घेतली जात नसल्याने मंदिरात देशी वातावरण निर्माण झाले आहे.

या परिस्थितीत प्रशासनाने स्वतः जातीने उपस्थित राहून गर्दी नियंत्रणासाठी कार्यान्वित राहणे गरजेचे असल्याची मागणी भाविकांकडून होत आहे. अधिकारी प्रत्यक्ष मैदानात उतरल्यास बेशिस्तीला आळा बसेल. तसेच मंदिरातील नियमांचे पालन होत आहे की नाही, यावरही प्रभावी नियंत्रण ठेवता येईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

 
Top