धाराशिव (प्रतिनिधी)- व्ही.पी. शैक्षणिक संकुलातील श्री साई जनविकास कृषी महाविद्यालय आणि जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालय, धाराशिव यांच्या संयुक्त विद्यमाने महाविस्तार या नव्या एआय-आधारित ॲप संदर्भात मार्गदर्शनपर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमासाठी तालुका कृषी अधिकारी महेश देवकते हे मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना व उपस्थित शेतकरी बांधवांना कृषी विभागाने विकसित केलेल्या महाविस्तार ॲपची सविस्तर माहिती दिली. या ॲपमध्ये हवामान अंदाज, पिकांसाठी आवश्यक खतांचे प्रमाण, कीड व रोग व्यवस्थापन, बाजारभाव यांसह विविध शेतीविषयक सुविधा उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले.महाविस्तार ॲप हे कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित असून, शेतकऱ्यांसाठी मराठी भाषेतील चॅटबोटची सुविधा देण्यात आली आहे. या चॅटबोटच्या माध्यमातून शेतकरी थेट प्रश्न विचारू शकतात. त्यामुळे शेतीकामात मोठी मदत होणार आहे. हवामान बदलामुळे निर्माण होणाऱ्या आव्हानांवर मात करण्यासाठी एआय तंत्रज्ञान उपयुक्त ठरेल, असे मतही त्यांनी व्यक्त केले. तसेच या ॲपद्वारे गोदाम व्यवस्था, डीबीटीवरील योजना आणि विविध शासकीय सुविधांची माहिती शेतकऱ्यांना मिळणार असल्याचे सांगितले.अध्यक्षीय भाषणात डॉ. प्रतापसिंह पाटील यांनी महाविस्तार ॲपचे कौतुक करताना, या उपक्रमामुळे शेतकऱ्यांना निश्चितच लाभ होईल, असा विश्वास व्यक्त केला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. प्रतापसिंह पाटील हे उपस्थित होते. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. क्रांतीकुमार पाटील, डॉ. अमित गांधले, महाविद्यालयाचे व्यवस्थापक प्रा.हरी घाडगे,कृषी विभागातील सहाय्यक कृषी अधिकारी सुषमा काळे, पीएम किसान ऑपरेटर अभिमन्यू हिप्परकर, सांख्यिकी ऑपरेटर सागर एडवे, तंटामुक्त अध्यक्ष श्यामसुंदर लावंड तसेच प्रगतशील शेतकरी बाळासाहेब वीर यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. एस. व्ही. भालेकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. डॉ. मोहसीन शेख यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, कर्मचारी व सहकाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
