धाराशिव (प्रतिनिधी)- महाराष्ट्रातील नगरपालिका आणि नगरपंचायत क्षेत्रात वास्तव्यास असलेल्या शेतकऱ्यांना शासनाच्या महात्मा गांधी ग्रामीण राष्ट्रीय रोजगार हमी योजनांचा माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या योजनांचा समान हक्काने लाभ मिळावा, अशी ठाम मागणी आज लोकसभेच्या शून्य प्रहरामध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी केंद्र सरकारकडे केली.
खासदार निंबाळकर यांनी आपल्या भाषणात स्पष्ट केले की, या नगरपालिका हद्दीमध्ये वास्तव्यास असणाऱ्या हजारो कुटुंबांची उपजीविका शेतीवर अवलंबून असूनही, त्यांना केवळ नगर पालीका क्षेत्रात वास्तव्यास असल्यामुळे अनेक योजनेच्या पात्रतेतून वगळल जाते. त्यामुळे शेतकरी विकासाच्या मुख्य प्रवाहापासून दूर राहतो. खासदार निंबाळकर यांनी सभागृहात नगरपालिका आणि नगरपंचायत क्षेत्रातील शेतकऱ्यांना शेतरस्ते, गाय-गोठा, वैयक्तिक विहीर, फळबाग लागवड, तुती लागवड यांसारख्या योजनांचा त्वरित लाभ द्यावा. ग्रामीण भागातील शेतकरी आणि नगरपालिका क्षेत्रातील शेतकरी यांच्यात असा भेदभाव होऊ नये. त्यांनी पुढे सांगितले की, शासनाच्या कृषी अनुदान, पायाभूत सुविधा आणि पशुपालन योजनांचा विस्तार या भागात केला तर शेती उत्पादन आणि उत्पन्न वाढेल, पाणी व सिंचन व्यवस्थेत सुधारणा होईल, फळबाग आणि तुती लागवड प्रोत्साहनामुळे टिकाऊ शेती उभी राहील, पशुपालनावर आधारित आर्थिक स्वावलंबन तयार होईल.
