कळंब (प्रतिनिधी)- समाजातील गरीब व गरजू लोकांना मदत करणे, त्यांच्या चेहऱ्यावर हास्य आणणे म्हणजेच देवपूजा आहे. मानवी जीवनाच खरे सौंदर्य सेवा आहे हेच खरे आहे असे मत हभप. बळीराम कवडे महाराज यांनी केले.
5 डिसेंबर रोजी सकाळ 10 ते 12 ह.भ.प. बळीराम महाराज कवडे यांचे दत्त जयंती निमित्त गुलाल व काल्याचे कीर्तनाने सांगता करण्यात आली.तयानंतर महाप्रसादाने सप्ताहाची सांगता झाली. यावेळी ते बोलत होते. महाराज म्हणाले की, जो दुसऱ्यांच्या हितासाठी जगतो, तोच खऱ्या अर्थाने जगतो. आपले ज्ञान, वेळ व प्रेम जर इतरांच्या उपयोगी लावले तर ते जीवन धन्य होते. धकाधकीच्या जीवनात मानसिक स्वास्थ्य हरवले आहे. मनाच्या शुद्धीकरणासाठी देवाचे नामस्मरण करणे, हाच एकमेव मार्ग आहे. सत्य, प्रेम, संयम, क्षमा हे जीवनाचे आधारस्तंभ आहेत. धर्म म्हणजे केवळ पूजा नव्हे तर नीतीने जगणे होय. आपल्याकडे जे आहे त्यात समाधान मानणे हेच आनंदाचे गुपीत आहे. जीवनाबद्दल तक्रारी नव्हे तर कृतज्ञतेची वृती ठेवली तर प्रत्येक क्षण अमृतासारखा होतो. आपण कोण आहोत, आपल्यात काय सामर्थ्य आहे हे जाणून घेणे म्हणजेच अध्यात्मिक वृती होय. जो स्वतःला ओळखतो तो जगालाही समजून घेतो. महाराष्ट्राला अनेक संतांची परंपरा असून आपण सर्वांनी संतांचे आदर्श घेत जगत असतो. संतांचे उपकार हे देवापेक्षा श्रेष्ठ आहेत.
या सप्ताहास श्री संत जणाबाई वारकरी शिक्षण संस्थेच्या अंदोरा येथील विद्यार्थांचा सहभाग होता. हभप. शाहू महाराज भारती आंदोरा, हभ प. चौरे महराज, हनुमंत पुरी,संतोष जोशी व कळंब बस आगारातील वाहक चालक यांत्रिक कर्मचारी यांनी या सप्ताहात परिश्रम घेऊन हा सप्ताह उत्साहात साजरा केला.
