कळंब (प्रतिनिधी)- जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या उपस्थितीत सिमुरगव्हाण (ता. पाथरी जि. परभणी) येथे गुरुवारी श्री दत्त जयंती सोहळा उत्साहात साजरा झाला. यावेळी सामाजिक उपक्रमातर्गत मराठवाड्यातील 80 शालेय विद्यार्थ्यांना मोफत सायकल वाटण्यात आल्या.
मराठवाडा पिठातर्फे या संपूर्ण सोहळ्याचे नियोजन करण्यात आले होते. सकाळी जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या हस्ते श्री दत्ताची विधिवत पूजा संपन्न झाली. दिवसभर पीठावर विविध आध्यात्मिक कार्यक्रम झाले. सायंकाळी 6 वाजल्या पासून दत्त जन्मोत्सव सोहळा झाला. यावेळी भाविकांची प्रचंड गर्दी होती. सायंकाळी मुख्य कार्यक्रमात संस्थानाच्या सामाजिक उपक्रमांतर्गत मराठवाड्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यातील 80 शालेय विद्यार्थ्यांना सायकलचे वाटप करण्यात आले. उपस्थितांच्या हस्ते हे वाटप झाले. यामध्ये आमदार राजेश विटेकर, आमदार विजयसिंह पंडित, आमदार कैलासज गोरंट्याल, आमदार राणा जगजितसिंह पाटील, संभाजीनगरचे माजी खासदार चंद्रकांत खैरे, सरपंच दुर्गा विष्णू उगले, बाळासाहेब शंकरराव देशमुख, विजय औताडे, माजी उपमहापौर छत्रपती संभाजीनगर वैशाली खराडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
सर्वांनी आपल्या भाषणात रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या प्रेरणेने सुरू असलेल्या विविध सामाजिक उपक्रमांचे कौतुक केले. रात्री पिठाचे उत्तराधिकारी प.पू. कानिफनाथ महाराज व जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांची प्रवचने झाली. त्यांनी श्री दत्तात्रेय यांच्या वैशिष्टयांची ओळख करून दिली. सद्गुरूंचे आपल्या आयुष्यात असलेले महत्व सांगितले. सद्गुरू आपले मन संतुलित ठेवतात. त्यासाठी त्यांचे मार्गदर्शन महत्वाचे असते, असे ते म्हणाले. या सोहळ्यासाठी भक्तांनी मोठी गर्दी केली होती. भाविकांसाठी चोविस तास महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.

