धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर साखर कारखान्याने 202526 गाळप हंगामात आजअखेर 1 लाख 35 हजार टन ऊसाचे गाळप पूर्ण केले आहे. गळीतास आलेल्या उसासाठी 24 नोव्हेंबर 2025 पर्यंतच्या उसाचा प्रथम हप्ता प्रतिटन 2,750 रुपये इतकी रक्कम दि. 10 डिसेंबर 2025 रोजी थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये जमा करण्यात आली.
या सोबतच कारखान्यात नोंद झालेल्या सर्व उसाचे गाळप पूर्ण करण्याची हमी कारखान्याच्या व्यवस्थापनातर्फे देण्यात आली. परिसरातील शेतकरी बांधवांनी सारासार विचार करून आपल्या सहकारी साखर कारखान्यावर विश्वास ठेवावा, तसेच नोंदलेल्या उसाचे गाळप नियमानुसार व वेळेत होणार असल्याचे कारखान्याचे संचालक ॲड. निलेश बारखडे-पाटील यांनी स्पष्ट केले. दरम्यान, शेतकऱ्यांच्या खात्यात उसाच्या प्रथम हप्त्याची रक्कम जमा झाल्याने परिसरात समाधान व्यक्त केले जात आहे. संस्थापक अध्यक्ष अरविंद गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याचे कामकाज सुरळीत व पारदर्शकपणे सुरू असल्याची प्रतिक्रिया शेतकरी बांधवांकडून व्यक्त होत आहे.