धाराशिव (प्रतिनिधी)-  येथील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित  धाराशिव जिल्ह्यातील रामकृष्ण परमहंस महाविद्यालय डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजी नगर अंतर्गत संपन्न झालेल्या शैक्षणिक व प्रशासकीय अंकेक्षणात धाराशिव जिल्ह्यातुन एकमेव ए प्लस ग्रेड घेऊन अव्वल ठरले.  एकुण 450 गुणांपैकी 387 गुण महाविद्यालयास प्राप्त झाले. या मोठ्या यशाबद्दल प्राचार्य डॉ संदीप देशमुख यांचा तसेच अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष प्रमुख डॉ मंगेश भोसले यांचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.

 यावेळी प्राचार्य डॉ संदीप देशमुख हे म्हणाले की, नविन शैक्षणिक धोरणांमुळे निश्चित पणाने विद्यार्थी केंद्रीत पध्दती विकसित होत आहे. रामकृष्ण परमहंस महाविद्यालय हे शिक्षणमहर्षी डॉ बापूजी साळुंखे यांच्या विचारांचे आचरण करत वाटचाल करत आहे. महाविद्यालयातील शिक्षक उत्तम दर्जाचे आहेत, विद्यार्थ्यांना संगणक ज्ञान, आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून महाविद्यालयात शिक्षण दिले जाते.   महाविद्यालयातील पायाभूत सुविधा उत्तम दर्जाच्या, शैक्षणिक गुणवत्ता उत्तम दर्जाची, कॉपीमुक्त परीक्षा या बाबी महाविद्यालयाच्या बाबतीत जमेच्या आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी भविष्यात रामकृष्ण परमहंस महाविद्यालयात प्रवेश घेऊन आपले भविष्य घडवावे, धाराशिव जिल्ह्यातील अनेक यशस्वी नागरिक या महाविद्यालयाने घडविले आहेत. महाविद्यालयाचे शैक्षणिक वातावरण सकारात्मक असल्याने येथील विद्यार्थी भविष्यात नक्कीच यशस्वी होतील यात शंका नाही. डॉ मंगेश भोसले आपली प्रतिक्रिया देताना म्हणाले की, महाविद्यालयास प्राप्त झालेला ग्रेड टिकवण्याची जबाबदारी ही शिक्षकांची आहे. विद्यार्थ्यांनी देखील या गोष्टीचे भान ठेवावे की आपण ए प्लस ग्रेड प्राप्त महाविद्यालयाचे विद्यार्थी आहोत, स्पर्धेच्या या काळात रामकृष्ण परमहंस महाविद्यालय हे धाराशिव जिल्ह्यासाठी वरदान ठरत आहे.  महाविद्यालयाच्या या यशाबद्दल श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे सन्माननीय कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे, सचिवा प्राचार्य शुभांगी गावडे, मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गावडे, सहाय्यक मराठवाडा विभाग प्रमुख प्राचार्य डॉ. जयसिंगराव देशमुख यांनी अभिनंदन केले आहे. या प्रसंगी महाविद्यातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
Top