धाराशिव (प्रतिनिधी)- श्रीसिद्धीविनायक परिवार धाराशिव यांच्या वतीने कळंब तालुक्यातील नागझरवाडीत येथे माती-पाणी तपासणी मार्गदर्शन कार्यशाळा घेण्यात आली. खामसवाडी येथे सुरू असलेल्या माती व पाणी परीक्षण संकलन केंद्राच्या माध्यमातून ही कार्यशाळा घेण्यात आली. 

श्रीसिद्धीविनायक परिवाराचे संस्थापक व भाजप जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमाचा अनेक शेतकऱ्यांना मोठा लाभ होत आहे. अल्प दरात माती-पाणी तपासणीची सोय उपलब्ध असल्याने शेतकऱ्यांना याचा मोठा आधार मिळतो आहे. दरम्यान नागझरवाडी येथील कार्यशाळेत बलराम कुलकर्णी आणि गजानन पाटील यांनी माती परीक्षणाच्या फायद्यांवर प्रकाश टाकला. मातीतील पोषकद्रव्य स्थिती समजल्यामुळे रासायनिक खतांचा अनाठायी वापर टाळता येतो, खतांचा खर्च घटतो, उत्पादनात वाढ होते तसेच जमिनीची सुपीकता दीर्घकाळ टिकवून ठेवता येते, असे त्यांनी नमूद केले. ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देणारे उद्योजक म्हणून दत्ता कुलकर्णी यांनी गूळ पावडर प्रकल्पाद्वारे ऊस उत्पादकांना बाजारपेठ उपलब्ध करून दिली असून, माती-पाणी परीक्षण केंद्राद्वारे शेतकऱ्यांच्या समृद्ध शेतीसाठी महत्त्वपूर्ण पुढाकार घेतल्याचेही यावेळी सांगण्यात आले. कार्यशाळेस नागझरवाडी व परिसरातील शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. विठ्ठल साळुंके, सयाजी साळुंके, नानासाहेब यादव, राम महाजन, कुमार साळुंके, प्रकाश साळुंके, मनोज साळुंके आदींसह अनेक शेतकरी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार विजय पोफळे यांनी मानले.

 
Top