धाराशिव (प्रतिनिधी)- काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि देशाचे माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचं आज (12 डिसेंबर) सकाळी लातूर येथे निधन झालं आहे. ते 91 वर्षांचे होते. लातूरमधील त्यांच्या 'देवघर' या निवासस्थानी सकाळी साडे सहा वाजताच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. वाढत्या वयानुसार असलेल्या दीर्घ आजारपणामुळे त्यांच्यावर घरीच उपचार सुरू होते. शिवराज पाटील चाकूरकर यांनी आपल्या प्रदीर्घ राजकीय कारकीर्दीत देशातील अत्यंत प्रतिष्ठित पदे भूषवली आहेत. त्यांनी लोकसभेचे सभापती (स्पीकर) म्हणून जबाबदारी सांभाळली होती. तसेच, केंद्र सरकारमध्ये त्यांनी केंद्रीय गृहमंत्री यासह विविध महत्त्वपूर्ण मंत्रीपदांवर काम केलं होतं. देशाच्या संवैधानिक प्रक्रियेत त्यांचा सहभाग अत्यंत महत्त्वपूर्ण होता.
लातूरचे 'सात वेळा' खासदार लातूरमधील चाकूर येथील मूळ रहिवासी असलेले शिवराज पाटील चाकूरकर हे मराठवाडा आणि महाराष्ट्रातील काँग्रेसचे एक प्रभावी आणि महत्त्वाचे व्यक्तिमत्व होते. त्यांनी लातूर लोकसभा मतदारसंघाचे सात वेळा यशस्वीपणे प्रतिनिधित्व केले होते. ज्यामुळे या मतदारसंघावर त्यांची मोठी पकड होती. 2004 मध्ये लोकसभेत पराभव झाल्यानंतरही, काँग्रेस पक्षाने त्यांच्या अनुभवाचा आदर करत त्यांना राज्यसभेवर पाठवले होते आणि त्यांच्याकडे केंद्रीय गृहमंत्रिपदाची महत्त्वाची जबाबदारी सोपवली होती. राजकीय वर्तुळात शोककळा शिवराज पाटील चाकूरकर यांच्या निधनाने काँग्रेस पक्षाचे आणि देशाच्या राजकारणाचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांच्या निधनाची बातमी कळताच काँग्रेस पक्षासह सर्व राजकीय पक्षांतील नेत्यांनी आणि त्यांच्या संघटनेतील कार्यकर्त्यांनी तीव्र दुःख व्यक्त केल आहे.
कौटुंबिक स्नेही तथा देशाचे माजी गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर साहेब यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखद आहे. राजकारणातील सभ्यता, विनयशीलता आणि तत्त्वनिष्ठ आचारधर्माचा एक आदर्श त्यांनी आपल्या कार्यातून निर्माण केला. आपल्या दीर्घ राजकीय कारकीर्दीत देशासाठी अनेक प्रतिष्ठित पदांवर त्यांनी कार्य केले व संवैधानिक प्रक्रियेत मोलाचे योगदान दिले.
चाकूरकर साहेब आमच्यासाठी केवळ ज्येष्ठ नेता नव्हते,तर ते सतत मार्गदर्शन करणारे, आपुलकीने आधार देणारे व कायम आशीर्वाद पाठीशी ठेवणारे वडीलधारी व्यक्तिमत्त्व होते. त्यांच्या शांत, संयमी आणि दूरदृष्टीपूर्ण सल्ल्यामुळे अनेक प्रसंगात योग्य दिशा मिळत असे. त्यांचा तो स्नेह, ती माया आणि योग्य वेळी दिलेला हृदयस्पर्शी आधार सदैव स्मरणात राहील. त्यांच्या जाण्याने सुसंस्कृत, प्रामाणिक आणि लोकांच्या भावना ओळखणारा एक मोठा आधारस्तंभ आपण गमावला आहे. त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो आणि चाकूरकर कुटुंबियांना या दुःखातून सावरण्याचे बळ मिळो, हीच आई तुळजाभवानीच्या चरणी प्रार्थना.
-आमदार राणाजगजितसिंह पाटील
शिवराज पाटील चाकूरकर साहेबांच्या निधनाची बातमी अत्यंत वेदनादायी आहे. निवडणुकीत आम्ही एकमेकांच्या विरोधात उभे राहिलो, परंतु व्यक्तिगत नात्यातील आपुलकी, स्नेह आणि परस्परांचा मान हे बंध नेहमीच अबाधित राहिले. मतभेदांच्या पलीकडेही ते माणुसकी जपणारे, सर्वांना जोडून ठेवणारे आणि प्रत्येकाशी प्रेमाने वागणारे नेते होते.
त्यांच्या मार्गदर्शनाची, मोठेपणाची आणि सौजन्याची कमतरता सदैव जाणवेल. चाकूरकर कुटुंबीयांना आणि त्यांच्या अनुयायांना या दुःखातून सावरण्याचे बळ मिळो, त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो हीच आई तुळजाभवानीच्या चरणी प्रार्थना.
- डॉ. पद्मसिंह पाटील
