धाराशिव (प्रतिनिधी)- हैदराबाद अधिनियम क्रमांक आठमध्ये सुधारणा करण्यात आली आहे. पाच टक्के नजराणा रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे मराठवाड्यातील आठही आणि विदर्भातील चंद्रपूर या जिल्ह्यातील रहिवासी क्षेत्रात असलेल्या भोगवटदार वर्ग-2 मालमत्ता वर्ग-1 होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या सुधारणेमुळे रहिवाशी क्षेत्रातील तब्बल 70 हजार प्लॉट अथवा घरे निःशुल्क वर्ग-1 होणार आहेत. धाराशिव जिल्ह्यातील दोन हजार 162 मालमत्ताधारकांना त्याचा लाभ होणार आहे. त्यामुळे निवासी प्रयोजनासाठी असलेल्या या मालमत्तांचे हस्तांतरण करण्यासाठी आता कोणाच्याही अनुमतीची गरज भासणार नसल्याची माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे.
मराठवाडा आणि विशेषत: धाराशिव जिल्ह्यातील वर्ग-2 निवासी जमिनीचा जटील बनलेला प्रश्न आता निकाली निघाला आहे. निवासी प्रयोजनासाठी असलेल्या सर्व मदतमाश वर्ग-2 जमीनी कोणत्याही प्रकारचे शुल्क न आकारता वर्ग-1 होणार असल्याचे राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सभागृहात जाहीर केले आहे. त्यासाठी हैदराबाद अधिनियम क्रमांक आठमध्ये सुधारणा केली जात असल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले आहे. राज्याचे तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली व तत्कालीन महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्यासह झालेल्या बैठकीत यास तत्वतः मान्यता देण्यात आली होती. मराठवाड्यातील एका महत्वपूर्ण विषयाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी न्याय दिला आहे. सर्वसामान्य नागरिकांसाठी हा विषय अत्यंत महत्वाचा होता. मराठवाड्यातील ज्या इनामी आणि देवस्थान जमिनी आहेत, त्या तातडीने नियमानुकुल करून घेण्यात याव्यात यासाठी आपला सातत्याने पाठपुरावा सुरू होता. नाममात्र नजराणा भरून या जमिनी वर्ग-1 मध्ये परावर्तित करण्याची मागणी आपण सातत्याने लाऊन धरली होती. याबाबत बऱ्याचदा बैठकाही झाल्या. त्यानुसार आता एक महत्वाचा निर्णय आपल्या महायुती सरकारने घेतला आहे. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, नांदेड, बीड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यासह चंद्रपूर जिल्ह्यातील राजोरा येथील निवासी प्रयोजनासाठी असलेल्या सर्व प्लॉट अथवा घरे निःशुल्क वर्ग-1 केली जाणार आहेत. या महत्वपूर्ण निर्णयामुळे धाराशिवसह मराठवाड्यातील सामान्य नागरिकांचा सुमारे 69 वर्षांपासूनचा प्रलंबित असलेला प्रश्न आता निकाली निघाला आहे. धाराशिव जिल्हा आणि खास करून धाराशिव शहरासाठी हा निर्णय खूप महत्वाचा ठरणार असल्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी म्हटले आहे.
