धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव नगरपालिकेत भारतीय जनता पक्षाने जोरदार मुसंडी मारत विजयश्री घेचून आणला. पालिकेच्या इतिहासात पहिल्यांदा भारतीय जनता पक्ष स्वबळावर विजय मिळवत नेहा राहुल काकडे नगराध्यक्षपदी विराजमान झाल्या आहेत. नगरसेवकपदाच्या 41 पैकी 22 जागा पटकावत पालिकेत क्रमांक एकचा पक्ष राहण्याचा बहुमान पटकावला आहे. भाजपाने डोअर टू डोअर केलेला प्रचार अन् प्रचारातील विकासचा मुद्दा भाजपासाठी प्लस पॉईट ठरला आहे.
पालिकेच्या निवडणुका जाहीर होताच पक्षांकडे प्रचार व नियोजनासाठी कमी अवधी शिल्लक होता. याच काळात आघाडी व महायुतीसमोर पक्षात समन्वय ठेवून मोर्चे बांधणी करणे तारेवरची कसरत होती. शिवसेना उबाठा व काँग्रेस पक्षाने एकत्र येत निवडणुकीच्या रिंगणात उभी होती. तर शरदचंद्र पवार पक्षाने स्वबळाचा नारा देत निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. भाजप, राष्ट्रवादी व शिवसेना शिंदे गट यांच्यातही जागा वाटपावर बिनसल्याने त्यांनी स्वतंत्र निवडणूक लढवली होती. कमी कालावधीत आमदार राणाजगजितसिंह पाटील जुन्या व नव्या चेहऱ्यांची सांगड साधत विकासाच्या मुद्यावर पालिकेची निवडणुकीची रणनिती आखली होती. आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचे पुत्र मल्हार पाटील यांनीही निवडझूक प्रतिष्ठेची बनवित प्रचार यंत्रणा हाती घेत उमेदवारांच्या प्रचारासाठी पायाला भिंगरी बांधली होती. विकासाठी देशात भाजप, राज्यात भाजप तर शहरातही भाजप हवा, असा प्रचार करीत विकासाचे मुद्दे हाती घेतले होते. त्याचा फायदा पक्षाला झाल्याचे निकालात दिसून आले आहे. शिवसेना (ठाकरे) व काँग्रेस या दोन पक्षाच्या प्रचारासाठी खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आमदार कैलास पाटील हे मैदानात उतरून प्रचार करत होते.
एमआयएमची पालिकेत पहिला नगरसेवक
धाराशिव पालिका निवडणुकीत एमआयएमने नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार उभा केला होता. नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार नाजिया युसूफ मोमीन यांनी 904 मते मिळविली. प्रभाग क्रमांक 18 ब मधून अजहर चाँद मुजावर यांनी 2331 मते घेत विजय मिळवला आहे. त्यांच्या विजयाने पालिकेत एमआयएमचा पहिला नगरसेवक निवडूक आला आहे.
मशाल राहिली तिसऱ्या क्रमांकावर
भारतीय जनता पक्षाने नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार नेहा काकडे यांनी 20 हजार 779 मते घेत विजयी मिळवला. दुसऱ्या क्रमांकावर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार परवीन कुरेशी यांनी 18 हजार 504 मते मिळाली. त्या दुसऱ्या क्रमांकावर राहिल्या. शिवसेना उबाठा पक्षाच्या उमेदवार संगिता गुरव यांनी 13 हजार 941 मते घेतले. त्या तिसऱ्या क्रमांकावर राहिल्या.